डोंबिवली : गेल्या सात वर्षांपासून रखडलेल्या कल्याण-शिळ महामार्गावरील पलावा जंक्शन उड्डाण पुलाचा कामाला सुरूवात झाली आहे. मनसेचे नेते तथा माजी आमदार राजू पाटील यांच्या नेतृत्वाखाली राजसैनिक, तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख दिपेश म्हात्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या पुलाच्या कामासाठी शनिवारी ३१ मे रोजी आंदोलन केले होते.
या आंदोलनाची दखल घेत एमएसआरडीसी अर्थात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने या कामाला वेग दिला. मात्र सोमवारी दुपारच्या सुमारास या कामात माशी शिंकली. या पुलावरून तापलेली डांबर मिश्रित खडी खाली कोसळली, अन् त्याचवेळी कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या एका कारवर खडी पडली. कारच्या काचा फुटल्या, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
कल्याण-शिळ महामार्गावर नित्यनेमाने अगदी न चुकता वाहतूक कोंडी होत असते. या मार्गावरून नियमीत ये-जा करणाऱ्या वाहन चालकांसह, प्रवासी आणि महामार्गाच्या दुतर्फा राहणाऱ्या रहिवाशांची या जाचातून सुटका होण्यासाठी पलावा जंक्शन जवळ उड्डाण पूल होणे गरजेचे असल्याने मनसेचे नेते तथा या भागाचे तत्कालिन आमदार राजू पाटील यांनी तगादा लावला होता. तांत्रिक कारणांमुळे पुलाचे काम सुरू होत नसल्याने सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या राजू पाटील यांनी गौप्यस्फोट करून खळबळ उडवून दिली होती. पुलाचे काम रखडण्याला अवैध बांधकामे कारणीभूत ठरल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला होता. अवैध बांधकामांना वाचविण्यासाठी उड्डाण पुलाचे संरेखन बदलले. तेथील एका हॉटेलसह दारूचे दुकान वाचविण्यासाठी चक्क खांबाचे स्थलांतर केल्याचा गौप्यस्फोट करून मनसे नेते राजू पाटील यांनी खळबळ उडवून दिली होती. या स्फोटांमुळे सरकारी पातळीवर तीव्र हालचाली झाल्या. त्याला ३१ मे रोजी ठाकरे बंधूंच्या दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन केलेल्या जनआंदोलनाची जोड मिळाली.
आता या पुलाचे काम सुरू होऊन ते लवकरच पूर्णत्वास जाईल, याची खात्री असतानाच सोमवारी दुपारच्या सुमारास या कामात माशी शिंकली. या पुलाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. विहित मुदतीत हे काम पूर्णत्वास नेण्यासाठी ठेकेदार आपल्यापरीने काम करताना दिसत आहे. मजुरांची लगबग सुरू आहे. पुलावर क्रेनद्वारे काम सुरू आहे. तथापी घाईगडबडीत सुरू असलेल्या या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या क्रेनच्या साह्याने डांबर मिश्रित खडी टाकण्यात येत आहे. हे काम सुरू असतानाच पुलाखालून एम एच ०४ / एम एच /३६१८ क्रमांकाची कार कल्याणच्या दिशेने जात होती.
या कारवर, तसेच रस्त्यावर तापलेली डांबर मिश्रित खडी कोसळली. सुदैवाने पुलाखालून कुणीही पादचारी ये-जा करत नव्हता. या दुर्घटनेत कारच्या काचा फुटल्या, मात्र आतील कुणीही जखमी झाले नाही. मात्र कारचे मोठे नुकसान झाल्याचे तेथून जाणाऱ्या परेश बडवे या जागरूक तरूणाने सांगितले. कोणत्याही प्रकारची दक्षता न घेता काम सुरू असल्याने हा घडला प्रकार घडल्याने परिसरातील रहिवाशांसह प्रवासी आणि वाहनचालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.