नेवाळी ( ठाणे ) : कल्याण-शीळ रस्त्यावरील पलावा उड्डाणपूलाच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. पुलाच्या लोकार्पणाच्या ७९ दिवसानानंतर पुलाची डागडुजी हाती घेण्यात आली आहे. सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर वाहतुकीच्या सेवेत आलेल्या उड्डाणपुलावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने वाहनचालक संतापले होते.
सोशल मीडियावर देखील निर्माण झालेल्या खड्ड्यांच्या सोशल मीडियावर प्रचंड रील तयार झाल्या होत्या. यामधून सत्ताधाऱ्यांना नेटकऱ्यांनी लक्ष केल होत. अखेर पावसाची संततधार थांबल्यानंतर रविवारी (दि.21) उड्डाणपुलावर डांबरीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
कल्याण शीळ रस्त्यावरील निर्माण होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता दोन उड्डाणपुलाचे भूमिपूजन पालकमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते सात वर्षांपूवी करण्यात आले होते. या दोन उड्डाणपुलांपैकी एका उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर आमदार राजेश मोरे आणि त्यांच्या शिवसेनेकडून ४ जुलैला घाईघाईत लोकार्पण केलं होते.
मात्र लोकार्पण झाल्यानंतर उड्डाणपुलावर अपघातांची मालिका सुरु झाल्याने पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यानंतर उड्डाणपूल वाहतुकीसाठी पुन्हा एकदा सुरु करण्यात आला होता. मात्र उड्डाणपुलावर निर्माण झालेल्या खड्ड्यांमुळे प्रचंड मनस्ताप वाहनचालकांना करावा लागत होता. आता उड्डाणपुलावरील वाहतूक खड्डेमुक्त होणार आहे. पलावा उड्डाणपुलाच्या कामासाठी कोट्यवधींचा निधी वापरण्यात आला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी निर्माण झालेल्या खड्ड्यांमुळे मनसेचे नेते राजू पाटील यासह ठाकरेंच्या सेनेकडून देखील सत्ताधार्यांना लक्ष करण्यात आले होते. अखेर खड्डेमुक्त उड्डाणपूल करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी डांबरीकरणाचे काम रविवारी हाती घेतल्याचे दिसून आले आहे.