

नेवाळी : सात वर्षात दोन पैकी एक उड्डाणपूल कल्याण डोंबिवलीकरांच्या सेवेत दाखल होताच खड्डेमय झाल्याने नेटकर्यांनी चांगलाच समाचार घेतला होता. त्यातच शिवसेनेविरोधात मनसेसह ठाकरे गटाने देखील सक्रिय सहभाग घेत उड्डाणपुलाच्या कामाच्या गुवत्तेवर प्रश्न उपस्थित करत स्ट्रक्चर ऑडिटची मागणी केली आहे. तब्बल 250 कोटी रुपये खर्चून निर्माण झालेला पूर्ण झालेला पूल खड्डेमय स्थितीत असल्याने वाहनचालकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
कल्याण शीळ रस्त्यावरील वाहतूक कोंडीने त्रस्त असलेल्या वाहनचालकांसाठी दोन उड्डाणपुलाची निर्मिती महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडून करण्यात येत होती. दोन उड्डाणपुलांपैकी एकाचे काम पूर्ण होण्यासाठी तब्बल सात वर्षांचा कालावधी लागल्याने विरोधक सातत्याने यावर आंदोलन करत होते.
राज्यातील मनसे आणि ठाकरे गटाची एकत्रित पहिली भेट याच उड्डाणपुलावर झाली होती. शिवसेनेचे आमदार राजेश मोरे यांनी या उड्डाणपुलाच्या लोकार्पणाची तारीख जाहीर केली होती. मात्र वेळेत लोकार्पण न केल्याने त्यानंतर गुपचूप लोकार्पण झाल्यानंतर काही वेळातच उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. या उड्डाणपुलाच्या कामासाठी झालेला खर्च तब्बल 250 कोटींच्या घरात असल्याची चर्चा आहे.
कल्याण डोंबिवलीच्या राजकीय वर्तुळात झालेल्या खर्चावरून नागरिक आक्रमक झाले आहेत. अनेकांनी माहितीच्या अधिकारात देखील उड्डाणपुलाच्या कामाची माहिती व खर्चाची माहिती मागवल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले आहे. या कामाच्या स्थितीवर व प्रत्यक्ष झालेल्या खर्चावर राजकीय नेत्यांसह प्रशासकीय अधिकारी देखील भाष्य करणेे टाळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
सात वर्षांत दोन उड्डाणपुलांपैकी एक उड्डाणपूल सत्ताधार्यांनी वाहतुकीच्या सेवेत दाखल करण्यासाठी लावला होता. मात्र त्याच्या कामात गुणवत्तेची ऐशी तैशी झाल्याने नेटकर्यांनी सत्ताधार्यांना फैलावर घेतले होते. सुमारे 562 मीटर लांबीच्या उड्डाणपुलाच्या कामासाठी अंदाजे 250 कोटी खर्च झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र कोट्यवधी रुपये खर्चून नशिबी खड्डेमय प्रवास असल्याने वाहनचालकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.