उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहशतवादी हल्‍ल्‍यात मृत्‍यूमुखी पडलेल्‍या कुटुंबांचे सांत्‍वन केले.  Pudhari Photo
ठाणे

Pahalgam Terror Attack | डोंबिवलीकर पीडित कुटुंबीयांच्या पाठीशी सरकार ठाम

Eknath Shinde | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या डोंबिवलीकर पर्यटकांच्या तिन्ही कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रविवारी भेट घेतली. यावेळी या कुटुंबीयांनी हल्ल्यासंदर्भातील दिलेली माहिती ऐकून अंगावर शहारे आले. घरांमधील तिन्ही कमावते पुरूष गेले आहेत. ही अतिशय दुखद घटना आहे. या तिन्ही कुटुंबीयांना शिवसेनेसह शासनाकडून सर्वोतपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीडित कुटुंबीयांच्या भेटीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना दिले.

जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथील बेसरन पठारावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संजय लेले, हेमंत जोशी आणि अतुल मोने यांच्या कुटुंबीयांची डोंबिवलीतील घरी जाऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी त्यांचे सांत्वन केले. या तिन्ही कुटुंबीयांकडून दहशतवादी हल्ल्यातील घटनाक्रम ऐकताना मन अतिशय हेलावून गेले. अंगावर शहारे आले. आपल्या समोर आपल्या कुटुंबीयांतील कर्ता पुरूष हल्ल्यात मारला जातो. इतके नृशंस कृत्य दहशतवाद्यांनी केल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. हेमंत जोशी माझे पक्के चाहते होते. माझ्याविषयी त्यांना खूप आपुलकी होती, असे त्यांच्या कुटुंबीयांनी मला सांगितले. संजय लेले कुटुंबीय आमचे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांच्या नात्यांमधील आहेत. ही तिन्ही कुटुंबे आमच्या परिवारातील आहेत. त्यामुळे या कुटुंबीयांच्या मुलांची शिक्षणे, नोकरी व इतर ज्या काही अडचणी असतील त्या शिवसेना म्हणून शासन म्हणून सोडविण्यास आम्ही समर्थ आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेऊन त्यांना आश्वस्त केले आहे. शासन या कुटुंबीयांना सर्वोतपरी सहकार्य करील, असे उपमुख्यमंत्री म्हणाले.

पाकिस्तानला ज्या भाषेत शिकवणे गरजेचे आहे, त्याच भाषेतून त्यांना उत्तर देण्यासाठी भारत आता सज्ज झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कठोर निर्णय घेतल्याचे खा. डॉ. शिंदे यांनी सांगितले. काश्मीरमधील ३७० कलम हटविल्यानंतर तेथे सुस्थिरपणा येत होता. शिक्षण, नोकऱ्या, व्यवसायात वाढ झाली होती. हे प्रकार विघातक शक्तींना पहावत नव्हते. या स्वस्थतेत अराजकपणा येण्यासाठी हल्ल्यासारखा प्रकार करण्यात आला आहे. पण हल्लेखोरांना प्रत्युत्तर देण्यासाठी केंद्र सरकारने कठोर पावले उचलली आहेत. त्या विघातक शक्तींची कठोर शिक्षा त्यांना मिळणारच आहे, असे डॉ. शिंदे यांनी सांगितले. यावेळी आमदार राजेश मोरे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, आमदार डाॅ. बालाजी किणीकर, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांच्यासह इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT