

डोंंबिवली : जम्मू-काश्मीरच्या पेहलगाम येथील बेसरन पठारावर जमलेल्या पर्यटकांवर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी गुरूवारी (दि.24) रोजी भाजपातर्फे डोंबिवलीच्या पूर्व रेल्वे स्थानक भागातील इंदिरा चौकात निदर्शने करण्यात आली. यावेळी निदर्शनकर्त्यांकडून हिंदू जागो रे...चा गजर करण्यात आला. दहशतवादी प्रवृत्ती आता मुळापासून ठेचलीच पाहिजे, अशी जोरदार मागणी यावेळी निदर्शनकर्त्यांकडून करण्यात आली.
बेसरनच्या पठारावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील तीन निष्पाप पर्यटक शहीद झाले. कर्ता पुरूष गेल्याने त्यांच्या कुटुंबीयांचा आधार गेला आहे. अशा निष्पाप पर्यटकांना दहशतवाद्यांनी लक्ष्य केल्याने समस्त भारतवासियांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांच्या निर्देशांनुसार माजी नगरसेवक राहूल दामले, शशिकांत कांबळे, डोंबिवली पूर्व मंडळ अध्यक्ष मीतेश पेणकर, नंदू परब, बाळा परब, महिला आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दहशतवादी भ्याड हल्ल्याचा डोंंबिवली पूर्वेतील इंदिरा चौकात निषेध केला. यावेळी डोंबिवलीकर देखिल उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
भ्याड हल्ल्याचा निषेध म्हणून डोंबिवली बंदची हाक देण्यात आली होती. त्यामुळे व्यापारी, दुकानदार आणि विक्रेते देखिल मोठ्या संख्येने भाजपाच्या हिंदू जागर कार्यक्रमात सहभागी झाले होते. हिंदू हितासाठी आपण संघटित झालेच पाहिजे. हिंदूंच्या एकजुटीमध्येच आपले हित आहे, असा संदेश या निषेध कार्यक्रमाच्या माध्यमातून भाजपाकडून देण्यात आला. यावेळी हिंंदू जागराची गाणी सामुहिक पध्दतीने गाण्यात आली. भ्याड हल्ला निषेधाचे फलक प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या हातात होते.
दहशतवादी शक्तीचे उच्चाटन करा, पाकिस्तानला धडा शिकवा, अशीच आक्रमक मागणी हे कार्यकर्ते करत होते. निषेध कार्यक्रमानंतर कार्यकर्त्यांनी नागरिकांना डोंबिवली बंद शांततेत पाळण्याचे आवाहन केले. सकाळपासून नेहमीच गजबजलेला डोंबिवली पूर्व आणि पश्चिम बाजारपेठांचा परिसर बंदमुळे गुरूवारी सकाळपासून सुनासुना दिसत होता. डोंबिवली जवळच्या गावांकडून काही महिला रेल्वे स्थानक भागात भाजी-पाला विक्रीसाठी येतात. त्यांनीही बंदमुळे सुट्टी घेतली आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी रिक्षा काही प्रमाणात सुरू होत्या. शहरातील सर्व उत्सवी कार्यक्रम बंद आहेत. शहराच्या विविध भागात संजय लेले, हेमंत जोशी आणि अतुल मोने यांना आदरांजली वाहणारे फलक लावण्यात आले आहेत. मृत पर्यटकांच्या कुटुंबीयांंच्या घरी आप्तस्वकीय, परिचित यांची सांत्वनासाठी गर्दी आहे.