Open manholes Kalyan pudhari photo
ठाणे

Open manholes Kalyan : कल्याण स्टेशन परिसरात 'मृत्यूचे मॅनहोल'

पालिकेच्या हलगर्जीपणाने लाखो प्रवाशांचा जीव धोक्यात

पुढारी वृत्तसेवा

सापाड : योगेश गोडे

मुंबई महानगर प्रदेशातील अत्यंत वर्दळीच्या कल्याण जंक्शन परिसरात उघडी ड्रेनेज चेंबर्स, गायब झालेली मॅनहोलची झाकणे आणि तुटलेले फुटपाथ यामुळे दररोज लाखो प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसामुळे पाणी साचत असल्याने उघडी चेंबर्स दिसत नसल्याने अपघाताचा धोका अधिक वाढला आहे.

मुंबई, ठाणे, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, कसारा, कर्जत, पुणे व नाशिककडे प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांची या स्थानकावर दररोज वर्दळ असते. मात्र स्टेशनबाहेरील धोकादायक परिस्थितीमुळे महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अनेक ठिकाणी मॅनहोलची झाकणे चोरीला गेली किंवा तुटली असून त्याठिकाणी ना बॅरिकेड्स आहेत, ना इशारा फलक. तुटलेले फुटपाथ आणि अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालावे लागत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी ड्रेनेज दुरुस्ती व मॅनहोल देखभालीवर कोट्यवधी रुपये खर्च होत असताना प्रत्यक्षात ही दयनीय अवस्था का, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

दुर्घटना घडण्यापूर्वीच उघड्या चेंबर्सना झाकणे बसवून सुरक्षितता उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे. या संदर्भात महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT