ऑनलाईन गुंतवणुकीमध्ये 85 गुंतवणूकदारांची करोडोची फसवणूक Pudhari File Photo
ठाणे

online fraud case : ऑनलाईन गुंतवणुकीमध्ये 85 गुंतवणूकदारांची करोडोची फसवणूक

कल्याणात ऑनलाईन गुंतवणूक घोटाळा उघडकीस

पुढारी वृत्तसेवा

सापाड : आकर्षक परताव्याचे आमिष दाखवत शेकडो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणार्‍या एका कथित कंपनीचा प्रताप उघडकीस आला आहे. या कंपनीकडून महाराष्ट्रातील 85 गुंतवणूकदारांची करोडो रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

कंपनीमार्फत गुंतवणूकदारांना ऑनलाइन टास्क पूर्ण करा आणि लाखो रुपये कमवा, असे स्वप्न दाखवून भामट्यांनी गरजवंत नागरिकांना जाळ्यात अडकवले. मात्र महिनोन्महिने पैसे परत न मिळाल्याने संतप्त गुंतवणूकदारांनी थेट कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली असून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीने काही महिन्यांपूर्वी कल्याण शहरात आपले कार्यालय उभे केले होते. या कंपनीचे एजंट नागरिकांना ऑनलाईन टास्कमध्ये पैसे गुंतवा आणि नऊ लेव्हल पूर्ण केल्यावर लाखो रुपये कमवा, असे आमिष दाखवत होते. कंपनीची सीईओ असलेली महिला असल्याचे सांगितले जात होते, तर दोन परदेशी एजंट या कंपनीच्या गटावर सक्रिय होते.

कंपनीने प्रत्येक गुंतवणूकदाराचे डिजिटल वॉलेट तयार केले होते. या वॉलेटमध्ये गुंतवणूकदारांचे पैसे व टास्क पूर्ण केल्यावर मिळालेला मोबदला दिसत होता. यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास बसला. मात्र काही महिन्यांनी पैसे परत मिळवण्यासाठी विचारणा केल्यावर कंपनीकडून उडवा-उडवीची उत्तरे मिळू लागली. टाळाटाळ केल्यानंतर अखेर गुंतवणूकदारांना आपल्या फसवणुकीची खात्री पटली.

संतप्त गुंतवणूकदारांनी थेट सीईओंना गाठले, मात्र त्यांनी जबाबदारी झटकली. यानंतर शेकडो गुंतवणूकदारांनी कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्यात गर्दी केली आणि गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. कल्याण पोलीस ठाण्यात गुंतवणूकदारांनी तक्रारी दाखल करण्यास सुरुवात केली असून प्राथमिक चौकशी सुरू आहे. कोट्यवधींचा हा घोटाळा उघड झाल्याने पुन्हा एकदा ऑनलाइन गुंतवणूक फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे.

या ऑनलाईन गुंतवणूक फसवणुकीविरोधात आता मनसेने कंबर कसली असून संपूर्ण गुंतवणूकदारांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष प्रणय साटम यांनी एकत्र करून गुंतवणूकदारांनी या विरोधात गुन्हा नोंदवण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत कठोर कारवाईची मागणी केली आहे.

सुरुवातीला वॉलेटमध्ये पैसे दिसत होते म्हणून आम्हाला खात्री वाटली. पण पैसे काढायला गेलो तेव्हा समजलं की ही सगळी फसवणूक आहे. आमचे लाखो रुपये बुडाले.
निलेश तळेले, पीडित गुंतवणूकदार
कंपनीच्या सीईओ आणि तिच्या साथीदारांनी सरळसरळ आमचा विश्वासघात केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी तत्काळ कठोर कारवाई करून दोषींना अटक करावी आणि आमचे पैसे परत मिळवून द्यावेत.
निखिल, पीडित गुंतवणूकदार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT