ठाणे : मध्य रेल्वे प्रशासनाने कोकण कॉरिडॉर रेल्वेमार्गावरील रेल्वे वाहतूक सुसह्य करण्यासाठी व डेडिकेट फ्रेट कॉरिडॉर महामंडळाच्या शीळ फाटा येथे असलेल्या रोड ओव्हर पुलाला हटविण्यासाठी आणि कोकण कॉरिडॉर रेल्वे मार्गावरील एक्सप्रेस रेल्वेची वाहतूक सहज आणि सुलभपणे होण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने कोकण कॉरिडॉर रेल्वे मार्गावरील निळजे ते दातिवली रेल्वे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गांवर 25 नोव्हेंबर, 30 नोव्हेंबर, तसेच 1 डिसेंबर, 2 डिसेंबर आणि 7 डिसेंबर, रोजी मध्यरात्री 1 वाजल्यापासून सकाळी 4 वाजेपर्यंत पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकचा परिणाम कोकण कॉरिडॉर रेल्वे मार्गावरील एक्स्प्रेस वाहतूक सेवांवर होणार असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.
निळजे ते दातिवली स्थानकावरील ट्रॅफिक पॉवर ब्लॉक दरम्यान मध्यरात्री प्रवास करणाऱ्या एक्स्प्रेस रेल्वे सेवांना इतर रेल्वे मार्गावर वळवण्यात येईल अथवा इतर रेल्वे स्थानकांवर नियमन करण्यात येईल. मंगळवार 25 नोव्हेंबर, रोजी रात्री प्रवास करणारी मंगळुरु-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सुपरफास्ट एक्स्प्रेस रेल्वे सेवेला ब्लॉकदरम्यान कळंबोली रेल्वे स्थानकावर 50 मिनिटे थांबवण्यात येईल. तसेच रविवार 30 नोव्हेंबर, रोजी मध्यरात्री कोकण कॉरिडॉर मार्गाने प्रवास करणारी दौंड-ग्वाल्हेर सुपरफास्ट एक्सप्रेस रेल्वेला कर्जत, कल्याण, वसई रेल्वे मार्गावर वळवण्यात येणार आहे. 2 डिसेंबर, रोजी मंगळुरु-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सुपरफास्ट एक्स्प्रेस रेल्वेला कळंबोली रेल्वे स्थानकांवर1 तास 15 मिनिटे थांबा देण्यात येईल. रविवार 7 डिसेंबर, रोजी मंगळुरु एक्स्प्रेस सेवेला कळंबोली स्थानकावर 50 मिनिटे थांबवण्यात येईल.
रविवारी 5 तासांचा मेगाब्लॉक
रविवारी 23 नोव्हेंबर रोजी ठाणे - कल्याण रेल्वे स्थानकांदरम्यान 5 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हार्बर, ट्रान्स-हार्बर रेल्वे मार्गावर कोणताही मेगाब्लॉक असणार नाही. मेगा ब्लॉकच्या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सकाळी 9:34 पासून संध्याकाळी 3:10 दरम्यान सुटणाऱ्या डाऊन जलद व अर्ध जलद लोकल रेल्वे सेवा ठाणे आणि कल्याण रेल्वे स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.
पनवेल-कळंबोली ट्रॅफिक पॉवर ब्लॉक
कोकण कॉरिडॉर रेल्वे मार्गावरून दिवसभरात प्रवास करणाऱ्या इतर एक्स्प्रेस रेल्वे आणि मेमू लोकल सेवांवर ब्लॉकचा परिणाम होणार नसल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने जाहीर केले. त्याचप्रमाणे मध्य रेल्वे प्रशासनाने रेल्वे वाहतूक नियंत्रित करण्यासाठी आणि कोकण कॉरिडॉर रेल्वे मार्गाची देखभाल, दुरुस्तीसाठी पनवेल ते कळंबोली रेल्वे स्थानकांदरम्यान 10 दिवस मध्यरात्री ट्रॅफिक पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे.