डोंबिवली : १७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास कल्याण पश्चिमेकडे असलेल्या बारावे गावातील शिवमंदिराजवळच्या कचरा कुंडीत स्त्री जातीचे बाळ आढळून आले होते. अनैतिक संबंधातून जन्माला घातलेल्या या बाळाला बेवारसरित्या फेकणाऱ्या तिच्या माता-पित्यावर पोलिसांनी कारवाई केली असतानाच या घटनेची पुनरावृत्ती कल्याण जवळच्या मोहने गावात घडली आहे. उल्हास नदीच्या किनारी असलेल्या पत्रा चाळीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला झाडी-झुडपांत पुरूष जातीचे दोन महिन्याचे बाळ आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
अनैतिक संबंधातून जन्माला आलेली ही बालके अशी प्रेमीयुगले कुटुंबीयांसह समाजाला काही कळू नये, तसेच पालकत्व लपविण्यासाठी असे प्रकार करत असल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात उघड झाले आहे.
बारावे गावातील शिवमंदिराजवळच्या कचराकुंडीत स्त्री जातीचे नवजात बालक टाकून देणाऱ्या रोहीत प्रदीप पांडे (२२) याला खडकपाडा पोलिसांनी अल्पवयीन बालकांचे संरक्षण कायद्यान्वये गुन्हा नोंदवून अटक केली आहे. एका १५ वर्षीय अल्पवयीन तरूणीसोबत अनैतिक संबंधातून स्त्री जातीच्या बाळाला जन्म दिल्याची कबूली त्याने पोलिसांना दिली. त्यामुळे त्याच्या गुन्हा दाखल केला. या प्रकरणातील सहभागी तरूणीलाही पोलिसांनी चौैकशीसाठी ताब्यात घेतले होते. या गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच आता खडकपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील उल्हास नदीच्या किनारी असलेल्या नीरा विक्री केंद्र टपरीच्या पाठीमागे, पत्रा चाळीकडे जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर झाडा-झुडपांच्या आडोशात पुरूष जातीचे दोन महिन्याचे बाळ पादचाऱ्यांना आढळले. हे जिवंत बाळ झाडा-झुडपांत ठेऊन पसार झालेल्यांच्या विरोधात सुरक्षारक्षक शिरीष शिंदे यांच्या तक्रारीवरून खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार शिंदे हे सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. रात्रीच्या सुमारास जेवणाचा डबा घेण्यासाठी उल्हास नदी पुलावरून पायी चालले होते. त्याचवेळी तेथून त्यांचे परिचित गंगाराम शर्मा हे शहाडकडे घरी चालले होते.
गंगाराम यांना रात्री पावणे दहा वाजण्याच्या दरम्यान झुडपातून बाळ रडण्याचा आवाज आला. म्हणून त्यांनी झुडपाच्या दिशेने जाऊन पाहिले तर तेथे एक पुरूष जातीचे बाळ झुडपाच्या आडोशाला ठेवलेले आढळले. त्याचवेळी तेथून जाणाऱ्या सुरक्षारक्षक शिरीष शिंदे यांना गंगारामने थांबवून प्रकार सांगितला.
तेथील उंदीर, घुशी, डास, मच्छरांमुळे बाळाच्या जीवाला धोका होता. दोघांनी परिसरात बाळाच्या पालकांचा शोध घेतला. मात्र कुणीही आढळून आले नाही.
सीसीटिव्ही फुटेजद्वारे तपासचक्रांना वेग
सुरक्षारक्षक शिरीष शिंदे यांनी पोलिस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून माहिती दिल्यानंतर खडकपाडा पोलिस घटनास्थळी आले. त्यांनी गंगाराम शर्मा यांच्या ताब्यातून बाळ ताब्यात घेतले. या बाळावर उपचारांसाठी केडीएमसीच्या रूक्मिणीबाई रूग्णालयात नेण्यात आले. बाळाचा जीव धोक्यात घालण्याची कृती करणाऱ्या त्याच्या अज्ञात निर्दयी पालकांच्या विरोधात अल्पवयीन मुलांचे संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. वरीष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. अमरनाथ वाघमोडे आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस निरीक्षक मारूती आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली खास पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून पालकांचा शोध सुरू केला आहे.