Thane Tourists Missing in Nepal
ठाणे : नेपाळमध्ये कैलास मानसरोवर पर्यटनासाठी गेलेल्या ठाणे जिल्ह्यातील १२ पैकी १० पर्यटकांशी महापुरामुळे संपर्क होऊ शकलेला नाही. सुदैवाने आज डोंबिवलीतील प्रकाश शांताराम माने आणि प्रतीक्षा माने या दाम्पत्यांचा संपर्क झाला असून ते सुखरूप आहेत. हे बारा पर्यटक मुंबईच्या अंधेरी येथील टूर ऑपरेटर हिल्स अँड ट्रायल्स( डॉ. चितळे ), रिचा टूर्स प्रा. लि. काठमांडू, समर्थ टूर्स अँड ट्रॅव्हल नेपाळ या कंपन्यांमार्फत गेले आहेत.
दरम्यान, शिवसेनेचे राहुल कनाल आणि आपत्ती व्यवस्थापन पथक नेपाळमध्ये दाखल झाले असून मदतकार्याला सुरुवात केली आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार नेपाळला पर्यटकांसाठी गेलेल्या ठाण्यातील समतानगर येथील गीता गोविंद सोसायटीमधील रेखा सतीश पाटणकर आणि सतीश पाटणकर हे दाम्पत्यांचा संपर्क होऊ शकलेला नाही. नौपाड्यातील घंटाळी सोसायटीमधील समीर जोशी आणि अपर्णा जोशी हे दाम्पत्यांचाही पुराची बातमी आल्यानंतर त्यांचा संपर्क होऊ शकलेला नाही.
डोंबिवली येथील पलावा संकुलातील सुनील सुदर्शन सुभेदार यांचा संपर्क तुटलेला आहे. कल्याणमधील आधारवाडी चौकातील श्रद्धा दर्शन अपार्टमेंटमधील संजय राजमल पाटील आणि नलिनी संजय पाटील, ठाण्यातील बाळकूममधील रहेजा कॉम्प्लेक्समधील रजनीश रघुनाथ नातू आणि वाशीममधील भांड यशास या दोन पर्यटकांचाही संपर्क तुटलेला आहे.
कल्याणच्या काळा तलावाजवळील सोनाली बिल्डिंगमधील अभिषेक घोणे यांचाही संपर्क होऊ शकलेला नाही. त्यांचा शोध सुरु असून कोणतीही जीवितहानी नोंदवली गेली असल्यास अद्याप खात्री झालेली नाही, असे ठाणे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.