Nitin Deshmukh to join ncp Ajit Pawar group
ठाणे : राज्यात महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. ठाणे जिल्ह्यात शरद पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली असून, जितेंद्र आव्हाड यांचे खंदे समर्थक आणि 'निष्ठावंत' म्हणून ओळखले जाणारे नितीन देशमुख आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटात प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे.
नितीन देशमुख हे लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश करणार आहेत. मुंबईतील विक्रोळी भागात नितीन देशमुखांचे राजकीय वर्चस्व आहे. त्यांच्या अजित पवार गटातील प्रवेश हा आव्हाडांना मोठघ धक्का मानला जात आहे.
पावसाळी अधिवेशनात विधान भवनाच्या लॉबीत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते ऋषीकेश टकले व शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांच्यात हाणामारी झाली होती. गोपीचंद पडळकरांकडून शरद पवार व सुप्रिया सुळे यांच्यावर होणाऱ्या आक्षेपार्ह टीकेतून ही घटना घडली होती. विधानभवनाच्या लॉबीतच हा प्रकार घडल्यामुळे मोठा संताप व्यक्त केला जात होता. विधानसभा अध्यक्षांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. पडळकरांविरोधात प्रचंड आक्रमक भूमिका घेणाऱ्या नितीन देशमुख यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने त्यांच्यावर प्रवक्तेपदाची जबाबदारीही सोपवली होती.
या पूर्वीही देशमुख चर्चेत आले होते. ज्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्यांदा 2019 रोजी शरद पवार यांची साथ सोडली होती देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी पार पडला होता. याचा त्यांना प्रचंड राग आला होता. त्यांनी थेट अजित पवार यांच्या विरोधात वृत्तपत्रात जाहिरात दिली होती. तसेच त्यावेळी शरद पवार समर्थक प्रचंड संतापले होते. शरद पवार यांच्या कार्यकर्त्यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरबाहेर अजित पवार यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली होती. यामध्ये नितीन देशमुख हा आघाडीवर होता. तेव्हापासून अजित पवार आणि नितीन देशमुख यांच्यात दरी निर्माण झाली होती.
2021 ला अजित पवार यांच्या वाढदिना दिवशी खोचक जाहिरात देशमुख याने दिली होती. . 'दोन हाणा, पण मला आपलं म्हणा. मला माफी, हेच तुमच्या वाढदिवसाचं रिटर्न गिफ्ट', अशी टिपण्णी असणारी ही जाहीरात त्यावेळी प्रचंड गाजली होती. आता शरद पवार यांच्यासह जितेंद्र आव्हाड यांचे कट्टर असलेले थेट उपमुखमंत्री अजित पवार यांच्या पक्षात सामिल होण्याची शक्यता आहे.