Navi Mumbai Airport Flight Services pudhari photo
ठाणे

Navi Mumbai Airport Flight Services : नवी मुंबईहून एका तासात जा थेट तळकोकणात

चिपी विमानतळासाठी सातही दिवस विमानसेवा, तारीख लवकरच जाहीर होणार

पुढारी वृत्तसेवा

मुंब्रा : नवी मुंबईहून आता एका तासाभरात तळकोकणात प्रवास करता येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ ते नवी मुंबई व नवी मुंबई ते चिपी विमानतळ अशी सातही दिवस विमानसेवा सुरू होत आहे. याचे वेळापत्रक देखील जाहीर केले आहे.

तळकोकणात असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावरून आता थेट नवी मुंबईपर्यंत ठवड्यातील सातही दिवस लवकरच विमानसेवा सुरू होणार आहे. नवी मुंबई ते तळकोकण असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आता ही मोठी आनंदाची बातमी आहे. चिपी ते नवी मुंबई व नवी ते मुंबई चिपी विमानसेवा आता आठवड्यातील सातही दिवस उपलब्ध होणार आहे.

रविवारसह दररोज विमानसेवा सुरू असणार आहे. यामुळे सिंधुदुर्गवासीयांना मोठा दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी ट्विटद्वारे ही अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे.

भाजपाचे नेते विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या पुढाकारातून हे विमानतळ उभे राहिले. कोकणातील पर्यटन उद्योगाला चालना मिळावी यासाठी हे विमानतळ उभारण्यात आले होते. मात्र येथून थेट मुंबई प्रवास करण्यासाठी अनेकदा विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न झाले. भाजपाचे युवा नेते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश आले आहे. या विमानसेवेचे दररोजचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

दीपक कपूर यांनी हे वेळापत्रक ट्विट केले आहे. जाहीर वेळापत्रका- नुसार, नवी मुंबई येथून सकाळी ७:५५ वा.विमान उड्डाण करेल आणि सकाळी ९:०५ वाजता सिंधुदुर्गात पोहोचेल. त्यानंतर सिंधुदुर्ग येथून सकाळी ९:२५ वाजता विमान उड्डाण करून सकाळी १०:३५ वाजता नवी मुंबई येथे दाखल होईल. चिपी विमानतळ ते नवी मुंबई व नवी मुंबई ते चिपी विमानतळ ही सेवा नेमकी कधीपासून सुरू होणार आहे, याच्या तारखाही लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत, अशी माहिती उच्चपदस्थ खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

सिंधुदुर्ग हवाई कनेक्टिव्हिटी

या विमानसेवेमुळे सिंधुदुर्ग आणि नवी मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांचा वेळ वाचणार असून, प्रवास अधिक जलद आणि सोपा होणार आहे. आठवड्याचे सातही दिवस विमानसेवा उपलब्ध होणार असल्याने सिंधुदुर्गच्या हवाई कनेक्टिव्हिटीला आता नवे पंख मिळणार आहेत. त्यामुळे येथील पर्यटन उद्योग व्यापार क्षेत्राला नवी दिशा मिळणार आहे. इथे काही महिन्यात रत्नागिरीचे अत्याधुनिक व सर्व अत्यावश्यक सुविधायुक्त विमानतळही सुरू होणार आहे.

कोकण पर्यटनाला बळ

चिपी विमानतळावरील वाहतुकीस गती मिळावी आणि कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीकोनातून वाढीव पर्यटन उद्योगाला बळ मिळावे यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली नवी मुंबई ते चिपी विमानतळ या विमान सेवेचा निर्णय घेण्यात आला. एका वर्षासाठी १६ कोटी ७४ लाख ६२ हजार रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT