Navi Mumbai Kalyan Dombivli water shortage
डोंबिवली : बारवी धरणाकडून नवी मुंबई आणि ठाण्यासह कल्याण-डोंबिवलीला पाणी पुरवठा करणारी महाराष्ट्र आद्योगिक विकास महामंडळाची १८०० मिलीमिटर व्यासाची उच्चदाबाने पाणी वाहून नेणारी जलवाहिनी सोमवारी (दि.२२) दुपारी फुटली. एकीकडे कल्याण-शिळ क्रॉस बदलापूर पाईपलाईन रोडला असलेल्या महामार्गावरील काटई गावच्या हद्दीत कुशाला पॅराडाईज हॉटेलजवळ ही वाहिनी फुटल्यानंतर या जलवाहिनीतून उच्च दाबाने ५० ते ६० फूट उंच पाण्याचे फवारे उडत होते. परिणामी जलवाहिनीच्या परिसरातील रस्ते जलमय झाले होते. तर दुसरीकडे या भागात सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पाच्या कामांमुळे जलवाहिनी फुटल्याच्या चर्चेला समाज माध्यमांवर उधाण आले होते.
कल्याण-शिळ महामार्गावर असलेल्या काटई फाट्यावर फुटलेल्या या जलवाहिनीतून उडणाऱ्या उंच उंच कारंज्याचे फोटो/व्हिडिओ रस्त्यावरील वाहन चालक आणि पादचारी आपल्या मोबाईलमधून काढताना दिसत होते. जलवाहिनीतील पाणी एकावेळी रस्त्यावर आल्याने वाहनांची वाहतूक मंदावली होती. त्यामुळे या भागात काही वेळ वाहतूकीची कोंडी झाली होती. वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मोबाईलद्वारे फोटो व्हिडिओ काढणाऱ्या वाहन चालकांना अटकाव केला. शिवाय गर्दी करून वाहतुकीची कोंडी करणाऱ्या वाहनांना तेथून तात्काळ हुसकावून लावले.
एमआयडीसीकडून कोळेगाव ते कुशाला पॅराडाईज हॉटेल दरम्यान नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्यासाठी लागणारी यंत्रणा या भागात कार्यान्वित आहे. शिवाय याच परिसरात मेट्रो प्रकल्पाचे देखिल काम सुरू आहे. या यंत्रणांचे काम सुरू असतानाच संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास १ हजार ८०० मीटर व्यासाची जलवाहिनी अचानक फुटली.
या जलवाहिनीतून उच्चदाबाने पाणी वाहत असते. तेच पाणी जलवाहिनी फुटताच उंच दिशेने उच्चदाबाने विविध आयाम घेऊन उडू लागले. उडणाऱ्या पाण्याचे सप्तरंगी इंद्रधनुष्यी तुषार आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी पादचाऱ्यांसह प्रत्येक वाहन चालकाची धडपड होती. अनेक जण आपली वाहने रस्त्याच्या कडेला उभी करून हा इंद्रधनुष्यी नजारा मोबाईल कॅमेऱ्यात टिपत होते. मेट्रोची कामे या भागात सुरू आहेत. त्यामुळे ही जलवाहिनी फुटल्याची चर्चा होती. या भागात मेट्रो प्रकल्पाच्या कामासाठी खोदकाम करताना तीन वेळा जलवाहिनी फुटल्याचे एमआयडीसीच्या निवासी विभागातील जागरूक रहिवासी राजू नलावडे यांनी सांगितले.
एमआयडीसीकडून कल्याण-डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई, अंबरनाथ औद्योगिक क्षेत्र, डोंबिवली औद्योगिक क्षेत्रासह २७ गावांना दररोज पाणी पुरवठा केला जातो. सोमवारी सायंकाळच्या सुमारास जलवाहिनी अचानक फुटल्याने मंगळवारी एमआयडीसीकडून कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता एमआयडीसीकडून व्यक्त करण्यात आली.
जलवाहिनीतून उच्चदाबाने पाणी वाहत असल्याने पाण्याची पातळी कमी होत नाही, तोपर्यंत दुरुस्तीचे काम हाती घेता येत नाही. हे काम कधी पूर्ण होईल हे सांगता येत नाही, असे एमआयडीसीच्या पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. एमआयडीसीच्या जलवाहिनीवरून पाण्याचे वितरण होणाऱ्या शहरांच्या पाणी पुरवठ्यावर जलवाहिनी फुटीचा परिणाम होणार असल्याचेही सांगण्यात आले.
त्यामुळे मंगळवारी बारवी धरणातून पाणी पुरवठा होणाऱ्या शहरांमध्ये काही भागात पाण्याचा ठणठणाट, तर अनेक ठिकाणी कमी दाबाने पाणी वितरण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. फुटलेल्या जलवाहिनीतील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर तातडीने दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. जलवाहिनी फुटल्याचे कळताच दुरूस्तीचे घटनास्थळी दाखल झाल्याचे एमआयडीसीकडून सांगण्यात आले. या जलवाहिनीतून वाहणारे पाणी थांबविण्यात आले होते. मात्र तोपर्यंत हजारो लिटर पाणी वाया गेल्याने या भागातील रस्त्याचा नदी आणि तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते.