Food Safety Raid Pudhari
ठाणे

Food Safety Raid: इथिलीन स्प्रे मारून आंबे पिकवणाऱ्यांना दणका

11 लाख 12 हजार रुपयांच्या आंब्यांसह 4 लाखांचा गुटखा जप्त : 37 जणांना अटक

पुढारी वृत्तसेवा

ठाणे: इथिलिन स्प्रेचा वापर करून आंबे पिकवणाऱ्या नवी मुंबईतील तीन मोठ्या आंबा विक्री आस्थापनांवर अन्न प्रशासनाने कारवाई केली. यात सुमारे 3,453 किलो आंब्यांचा साठा जप्त करण्यात आला असून, या जप्त केलेल्या आंब्यांची एकूण किंमत 11 लाख 12 हजार 850 रुपये इतकी आहे.

तसेच तंबाखू विरोधी दिनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात केलेल्या कारवाईत सुमारे 4 लाख 74 हजारांचा गुटखा, पानमसाला, सुंगधित तंबाखूचा साठा जप्त केला आहे. या धडक मोहीमेत 37 जणांना अटक केली असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 31 आस्थापनांना सील ठोकण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांत कारवायांत थंडावलेल्या अन्न आणि औषध प्रशासनाला तुकाराम मुंडे यांच्या रूपाने धडाकेबाज आयुक्त लाभल्याने प्रशासनातील अधिकारीही मरगळ झटकून कामाला लागले आहेत. 30 व 31 मे रोजी एपीएमसी मार्केट व परिसरात जोरदार तपासणी मोहीमा हाती घेतल्या. यात मोहिमेत काहीजण आंबा पिकविण्यासाठी थेट आंब्यावर इथिलिनसदृश्य स्प्रेचा वापर करत असल्याचे निदर्शनास आले.

घातक रसायनांचा वापर नाही

नियमांचा भंग करून ग्राहकांच्या आरोग्याला बाधा होईल अशा पध्दतीने आंबे पिकविले जात असल्याने ही कारवाई करण्यात आली. या जप्त केलेल्या आंब्यांचे नमुने प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठवण्यात आले आहेत. आंबे पिकवण्यासाठी इथिलीन स्प्रेचा वापर केला असला तरी कॅल्शियम कार्बाईडसारख्या घातक रसायनाचा वापर आढळून आलेला नसल्याचे अन्न प्रशासनाने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT