भिवंडी : केंद्र व राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण होण्यापूर्वी या विमानतळास लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील यांचे नाव न दिल्यास या विमानतळावरून 25 डिसेंबर रोजी एकही विमान उडू देणार नाही असा इशारा खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी भिवंडी येथे दिला आहे. मानकोली येथे पाच ही जिल्ह्यातील भूमिपुत्रांच्या संघटनांच्या बैठकी नंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
4सप्टेंबर रोजी विमानतळास स्व.दिबा पाटील यांचे नाव द्यावे याकरिता खासदार सुरेश म्हात्रे यांनी भिवंडी ते जासई येथ पर्यंत भव्य कार रॅलीचे आयोजन करून या मागणीकडे सरकारचे लक्ष केंद्रित केले होते.यानंतर विमानतळाच्या उद्घाटनापूर्वी नामकरणाचा निर्णय घ्यावा यामागणीसाठी सहा ऑक्टोबर रोजी पाचही जिल्ह्यांमधील स्थानिक भूमिपुत्रांच्या संघटनांच्या माध्यमातून उग्र जन आक्रोश आंदोलन नवी मुंबई विमानतळ या ठिकाणी केले जाणार होते.
या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक भूमिपुत्र संघटना तसेच सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींच्या 3 ऑक्टोंबर रोजी आयोजित केलेल्या बैठकीत विमानतळास उद्घाटनानंतर अडीच महिन्यात स्व.दिबा पाटील यांचे नाव देण्याबाबत निर्णय घेतला जाईल. तसा प्रस्ताव राज्य शासना कडून केंद्र सरकारला पाठविला असल्याचे आश्वासन दिले आणि त्यामुळे जन आक्रोश आंदोलन स्थगित करण्यात आले होते. परंतु उद्घाटन होऊन दोन महिने उलटून गेले 25 डिसेंबर रोजी विमानतळावरून पहिले उड्डाण होणार असल्याचे जाहीर झाले तरी स्व.दिबा पाटील यांचे नाव देण्याबाबत कोणताही निर्णय घेतला गेलेला नाही.
केंद्र सरकारकडे हा प्रस्ताव धूळखात पडला आहे.त्यामुळे स्थानिक भूमिपुत्रांमध्ये प्रचंड रोष असून त्यामुळे अजून वीस दिवस आम्ही सरकारच्या घोषणेची वाट पाहणार,पण त्यानंतर 22 डिसेंबर रोजी मानकोली येथून पायी जन आक्रोश आंदोलन सुरू करणार असून 24 डिसेंबर रोजी नवी मुंबई विमानतळ येथे दाखल होऊन विमानतळा वरून 25 डिसेंबर रोजी एका ही विमान उडू अथवा उतरू देणार नाहीत असा निर्वाणीचा इशारा खा.सुरेश म्हात्रे यांनी दिला आहे.
2015 पासून स्थानिक भूमिपुत्रांची ही मागणी जाणीवपूर्वक डावलली जात असल्याने सर्व पाच ही जिल्ह्यातील सागरी भूमिपुत्र समाजामध्ये प्रचंड रोष असून ,सरकारच्या हाती 20 दिवस आहेत त्यादरम्यान समाजाच्या रोषाची वाट न पाहता स्व. दि.बा.पाटील यांचे नाव विमानतळास द्यावे अन्यथा संघर्ष अटळ आहे असा निर्वाणीचा इशारा खा.सुरेश म्हात्रे यांनी शेवटी दिला आहे.यावेळी नवी मुंबई येथील निलेश पाटील , सागर पाटील,गिरीश साळगावकर,धीरज पाटील,रवी मढवी,अतुल म्हात्रे रोशन पाटील, सर्वेश तरे यांसह विविध भूमिपुत्र संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.