नेवाळी: नवी मुंबई महानगरपालिकेत 14 गावांचा समावेश होऊन बराच कालावधी उलटला, महापालिका निवडणुकाही पार पडल्या आणि 14 गावांतून तीन नगरसेवक निवडून आले, मात्र आजही या गावांपैकी पाच ग्रामपंचायतींची दफ्तरे महापालिकेकडे पूर्णपणे जमा झालेली नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून भाजपच्या सत्ताधारी महापालिका प्रशासनावर निष्क्रियतेचा आरोप होत आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठ्या गाजावाजात 14 गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्यात आला होता. गावांच्या विकासासाठी पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य आणि मूलभूत सुविधांची मोठी आश्वासने देण्यात आली होती.
मात्र प्रत्यक्षात आजही ग्रामपंचायतींची दप्तरे ताब्यात न घेतल्याने अनेक विकासकामे रखडलेली आहेत. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन एकमेकांकडे जबाबदारी ढकलत असल्याचे चित्र दिसत आहे. प्रशासनाच्या व सत्ताधाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे जन्म मृत्यू नोंद प्रमाणपत्रांसाठी व अन्य कामांसाठी 14 गावातील नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष जीवन वालीलकर यांनी सांगितले की, ग्रामपंचायतींची दप्तरे महापालिकेकडे जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी ती अद्याप पूर्ण झालेली नाही. प्रशासनाने 15 मेपर्यंतची अंतिम मुदत दिली असून त्या वेळेत महापालिकेचे प्रशासन पूर्णपणे कार्यान्वित होईल, असे सांगितले आहे. मात्र यापूर्वीही अनेक आश्वासने हवेत विरल्याने नागरिकांमध्ये साशंकता आहे. 15 मेपर्यंत काम सुरू न झाल्यास महापालिकेवर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा त्यांनी दैनिक पुढारीशी बोलताना दिला आहे.
दरम्यान, कर्मवीर नगरीतील पिंपरी ठाकूरपाडा परिसरात पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. जमिनीत केमिकल असल्याने बोअरवेलमधून दूषित पाणी येत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नळपाणी योजना अपूर्ण आहे. याशिवाय वाहतूक कोंडी, रस्त्यांवरील अतिक्रमण आणि भंगार माफियांचा वाढता त्रास यामुळे नागरिक त्रस्त आहेत.
प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
भाजपची महापालिकेत एकहाती सत्ता असताना देखील 14 गावांच्या मूलभूत समस्या कायम असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नगरसेवक भरत भोईर यांनी सांगितले की, आयुक्त, महापौर, सागर नाईक यांच्या उपस्थितीत गणेश नाईक यांच्या आदेशाने बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत आयुक्तांनी 15 मेपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे स्पष्ट आश्वासन दिले आहे. आता प्रत्यक्ष कृती होते की पुन्हा आश्वासनांची पुनरावृत्ती होते, याकडे 14 गावांचे लक्ष लागले आहे.