कसारा घाटात गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास सिमेंट वाहून नेणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झाला Pudhari
ठाणे

Kasara Ghat Accident | कसारा घाटात सिमेंटचा ट्रक दरडीवर आदळला; एकाचा मृत्यू, ११ जखमी

पहाटे तीनच्या सुमारास भीषण अपघात; चालकाचा ताबा सुटल्याने दुर्घटना, ट्रकमधून प्रवास करणारे प्रवासी जखमी

पुढारी वृत्तसेवा

Nashik Mumbai Highway Truck Accident

कसारा : नाशिक-मुंबई महामार्गावरील कसारा घाटात गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास सिमेंट वाहून नेणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झाला. भरधाव ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्यालगतच्या मोठ्या दरडीवर जाऊन आदळला. या दुर्घटनेत ट्रकचा वाहक शेख महोम्मद मुनाफ कुरेशी याचा जागीच मृत्यू झाला, तर ११ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला नाशिक येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मालेगाव येथून सिमेंट घेऊन एमएच ४३ बीएक्स २४२४ क्रमांकाचा ट्रक भिवंडीच्या दिशेने निघाला होता. ट्रक चालक मुझ्झफर महोम्मद (वय ४६, रा. मालेगाव) याने मालेगाव महामार्गावरून कल्याण आणि भिवंडीच्या दिशेने जाणाऱ्या काही प्रवाशांना ट्रकच्या केबिनमध्ये बसवले होते. त्यानंतर ट्रक भिवंडीच्या दिशेने रवाना झाला. पहाटेच्या सुमारास कसारा घाट उतरतानाच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रक थेट एका मोठ्या दरडीवर जाऊन आदळला.

या अपघातात ट्रकचा वाहक शेख महोम्मद मुनाफ कुरेशी याचा जागीच मृत्यू झाला. तर ट्रकमधून प्रवास करणारे शबान अब्दुल शेख (४५, कल्याण), शकील खलील शेख (१९, भिवंडी), जकिरा करीम सय्यद (६५, भिवंडी), अफसाना सय्यद (३६, भिवंडी), वसीम करीम सय्यद (४३, भिवंडी), अलिशा सय्यद (२०, भिवंडी), महोम्मद सय्यद (८४, भिवंडी), वारीस सय्यद (८४, भिवंडी), मुस्कान सय्यद (११, भिवंडी), अनम अन्सारी (३५, भिवंडी) आणि शकील अन्सारी (३०, भिवंडी) हे ११ जण जखमी झाले.

पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाचे मदतकार्य

अपघाताची माहिती मिळताच कसारा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार चौधरी, बोरकर यांच्यासह कसारा आपत्ती व्यवस्थापन पथकाचे सदस्य सुनील करवर, नंदू जाधव, शाम धुमाळ, दत्ता वाताडे, लक्ष्मण वाघ तसेच घोटी महामार्ग पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. महामार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांचीही मदत घेण्यात आली. जखमींना रुग्णवाहिकांच्या माध्यमातून शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमीला पुढील उपचारांसाठी नाशिक येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. या प्रकरणी कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी निखिल लसने आणि महामार्ग पोलीस केंद्राचे राम होंडे पुढील तपास करीत आहेत.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मदतीचा अभाव

या भीषण अपघातानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि टोल कंपनीकडून कोणतीही मदत उपलब्ध झाली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी खासगी वाहनचालकांची मदत घ्यावी लागली. महामार्गावर अपघात घडल्यानंतर तातडीने मदत मिळणे अपेक्षित असताना संबंधित यंत्रणांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

पैसे आणि वेळ वाचविण्याच्या नादात जीव धोक्यात

मालेगाव, धुळे आणि नाशिक येथून मुंबईकडे जाणारे अनेक प्रवासी रात्रीच्या वेळी ट्रक, टेम्पो आणि कंटेनरमधून प्रवास करतात. शासकीय बसचा पर्याय उपलब्ध असतानाही पैसे आणि वेळ वाचविण्याच्या उद्देशाने अशा मालवाहू वाहनांमधून प्रवास केला जातो. हा प्रवास अत्यंत धोकादायक असून, अशा प्रकारे प्रवाशांची वाहतूक करणाऱ्यांवर कठोर निर्बंध घालण्याची गरज व्यक्त होत आहे.

चालकाची प्रसंगावधानता; मोठी दुर्घटना टळली

पहाटे तीनच्या सुमारास कसारा घाट उतरताना चालकाला डुलकी लागल्याने वाहनावरील नियंत्रण सुटल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ट्रक नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच चालकाने ट्रक दरीच्या दिशेने न वळवता दरडीच्या दिशेने वळवला. त्यामुळे ट्रक दरडीवर आदळला. चालकाने प्रसंगावधान राखल्यामुळे ट्रक दरीत कोसळण्याची मोठी दुर्घटना टळल्याची चर्चा घटनास्थळी होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT