

शाम धुमाळ
कसारा : मुंबई-नाशिक महामार्गवरील निकृष्ठ दर्जाच्या कामामुळे दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशाचा जीव टांगणीला लागला आहे. या मार्गावरील कसारा घाटातील निकृष्ट दर्जाच्या कामामुळे आज (दि.११) जव्हार फाट्याच्या अलीकडे असलेल्या वळणावर २० फूट लांब अंतरावर संरक्षक कठडे कोसळून त्याखालील माती ढासळली आहे. यामुळे मुंबई नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला आहे.
गेल्या पाच दिवसांपासून सतत मुसळधार पावसामुळे जुन्या कसारा घाटातील रस्त्याखालील मातीचा भराव वाहून गेला आहे. त्यामुळे अवघ्या 4 महिन्यापूर्वी दुरुस्तीचे काम केलेली संरक्षण भिंत देखील पडली. परिणामी यामुळे महामार्गालादेखील काही प्रमाणात तडे पडले आहेत.
सध्या या महामार्गावर बॅरिकेट लावून नाशिककडे जाणारी वाहतूक ऐकीरी मार्गाने सुरू आहे. मात्र जर पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाला निम्म्याहून अधिक रस्ता खचण्याची चिन्हे दिसत आहेत. आज पहाटेच्या सुमारास कसारा घाटातील जव्हार फाटाच्या अलीकडे असलेल्या वळणावर रस्त्याच्या डाव्या बाजूला अस्लरले संरक्षण कठडे अचानक कोसळले. संरक्षक कठडे कोसळताच साईड पट्टीवरील माती, दगड देखील खाली दरीत वाहून गेली. या प्रकारांमुळे मुंबई नाशिक महामार्गवरील रस्त्याना धोका निर्माण झाला असून, रस्ता खचण्याची शक्यता नाकारता येत ना.ही २० फुटांपेक्षा अधिक लांबी असलेले संरक्षक कठडे कोसळले. त्या ठिकाणच्या रस्त्याखालील माती निघत असून पुढील काही दिवस या जुन्या घाटात ५०० मीटर अंतर एकेरी वाहतूक सुरु राहणार आहे.
वर्षभर कामाचा ठेका...
दरम्यान कसारा घाटातील संरक्षक कठड्याच्या कामाचा ठेका राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने एका मर्जीतील ठेजेदाराला दिला आहे. परंतु या ठेकेदाराकडून रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या दरीकडील भागाकडे संरक्षक भिंत चे काम करताना प्रवाशी हित बघितले जातं नाही. संरक्षक भिंत कठड्याचे काम करताना सिमेंटऐवजी ग्रीट पावडरचा वापर केला जात आहे. या भिंतीचे काम करतेवेळी भिंतीत स्टील वजा लोखंडचा वापर केला जातं नाही. त्यामुळे दुचाकी जरी धडकली तरी भीत कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कसारा घाटातील प्रवास धोक्याचा ठरत आहे. लाखो रुपयाचे टेंडर दर चार महिन्याला काढून प्रवाशाचा जीवन धोक्यात घालत आपली पोळी भाजण्याचा प्रताप ठेकेदार कंपनीकडून केला जास्त आहे.