आसनगाव ( ठाणे ) : शहापूर तालुक्यातील माहुली किल्ल्याच्या पायथ्याजवळ असलेले प्राचीन नंदिकेश्वराचे शिवमंदिर हे दुर्लक्षित असलेले दिसून येत आहे. श्रावण महिना म्हटला की विशेषत: श्रावणातल्या सोमवारी भाविकांची शिवमंदिरात रिघ दिसून येते. हे मंदिर जरी आज दुर्लक्षित असले तरी भाविकांची पावले येथे वळताना दिसतात. श्रावणी सोमवारी परिसरातील बहुसंख्य शिवभक्त भाविक नंदिकेश्वर येथे आवर्जून दर्शनासाठी येत असतात.
वांद्रे गावानजीक निसर्गरम्य वातावरणात घनदाट जंगलात पुरातन काळातीच नंदिकेश्वर हे शिवमंदिर आहे. या शिवमंदिराकडे जाण्यासाठी वासिंद येथून रस्ता असून सदर अंतर जवळपास 11 कि.मी. आहे, येथे जाण्यासाठी वासिंद रेल्वे स्टेशनला उतरावे लागते. मुंबई-नाशिक महामार्गावरून देखील या शिवमंदिराकडे जाण्यासाठी खासगी वाहनांची व्यवस्था दिसून येते.
या मंदिरामध्ये अप्रतिम कोरीव काम केलेल्या असंख्य दगडी मूर्ती आढळतात. तर मंदिरात शिवलिंग आणि भग्नावस्थेतील गणेश मूर्ती देखील आहे. श्रावणी सोमवारी विशेषत: येथे भाविकांची पावले दर्शनासाठी वळतात.
1970 साली मिठाराम बाबा या शिवभक्ताने या मंदिरात मूर्तींची पुनर्स्थापना स्थापना केली आहे. हे मंदिर हेमाडपंती असावे, असा कयास बांधता येतो. या परिसरात अनेक दुर्मिळ औषधी वनस्पती दिसून येतात. शासनाच्या पुरातत्व विभागाने या मंदिराकडे लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.
मंदिराच्या बाहेर दगडात कोरीव काम करून बनविलेला भला मोठा रांजण दिसून येतो. स्थानिक भाषेत त्याला नांद असे म्हटले जाते. यामध्ये जनावरांसाठी पिण्याचे पाणी ठेवले जाते. हा नांद काही लोकांनी चोरून नेल्याची दंतकथा येथे सांगितली जाते. मात्र त्या चोरांनी हा नांद पुन्हा या जागेवर आणून ठेवला. या नांदावर नागाच्या आकाराची नक्षी कोरलेली दिसते. त्यावरून हे मंदिर नागकालीन असावे, असा एक अंदाज वर्तविला जातो.