

कणकवली या तालुका मुख्यालय शहरापासून सुमारे 18 कि.मी. अंतरावर दिगवळे गाव वसले आहे. विकासाभिमूख वाटचाल करणार्या या गावाची ग्रामदेवता श्री देव स्वयंभू व श्री दिर्बादेवी ही जागृत देवस्थाने म्हणून प्रसिद्ध आहेत. समस्त दिगवळे वासियांची नितांत श्रद्धा या ग्रामदेवतांवर आहे. या श्री स्वयंभू मंदिरातील वार्षिक हरिनाम सप्ताह साजरा होत आहे. मंदिरात आज हरिनाम सप्ताहाबरोबरच महाशिवरात्रोत्सवही साजरा होणार आहे. या निमित्त सुमारे एक हजार वर्ष पुरातन व पांडवकालीन अख्यायिका असलेल्या या मंदिराची ओळख सांगताना...
‘स्वयंभू’ अर्थात भूमीतून नैसर्गिकरित्या निर्माण झालेले. दिगवळे गावचे ग्रामदैवत श्री स्वयंभू हे शिवशंकराचे स्थान असेच स्वयंनिर्मित मानले जातेे. मालवणी भाषेत यालाच ‘रुजवी पाषाण’ असेही संबोधतात. या मंदिराचा लिखित इतिहास 11 व्या शतकातील म्हणजेच सुमारे हजार वर्षांपूर्वीचा असल्याने श्री देव स्वयंभू हे देवस्थान अंदाजे सहस्त्र वर्ष पुरातन आहे.
सह्याद्रीच्या पर्वताच्या व ऐतिहासिक किल्ले भैरवगडच्या पायथ्याशी वसलेले दिगवळे गाव निसर्गसौंदर्य व साधनसंपत्तीने संपन्न आहे. या गावचे ग्रामदैवत श्री देव स्वयंभू-दिर्बादेवी आहे. श्री स्वयंभू मंदिरात दरवर्षी वार्षिक अखंड हरिनाम सप्ताह सात दिवस साजरा होतो.
कालाष्टमी ते महाशिवरात्री या कालावधीत साजरा होणारा हा हरिनाम सप्ताह समस्त ग्रामस्थ, पै-पाहुणे व शिवभक्तांसाठी आनंदाची पर्वणी असते. कालाष्टमी दिवशी विधीवत घटस्थापनेने या हरिनाम सप्ताहाची सुरूवात होते. त्यानंतर महाशिवरात्री पर्यंत मंदिरात अखंड हरिनामाबरोबरच दररोज पूजा, शिवपिंडी अभिषेक, भजने, वारकरी दिंड्या, पालखी मिरवणूक व अन्य सांस्कृतिक कार्यक्रम सादर होतात. याच कालावधीत ग्रामस्थ व अन्नदात्यांच्यावतीने भाविकांसाठी मंदिरात महाप्रसादाचे आयोजन केले जाते. एकादशीपासून दररोज रात्री मंदिर सभोवताली पालखी प्रदक्षिणा होते. यावर्षी एकादशी निमित्त मंदिरात हरिपाठाची 11 आवर्तने करण्यात सप्ताहाचे वेगळे वैशिष्ट्य ठरले. महाशिवरोत्सवाच्या दुसर्या दिवशी सकाळी घटविसर्जन व समाराधना कार्यक्रमाने या हरिनाम सप्ताहाची सांगता होते.
हरिनाम सप्ताहानिमित्त ग्रामस्थांबरोबरच पै-पाहुणे, भाविक, शिवभक्त, चाकरमानी श्री स्वयंभू चरणी नतमस्तक होतात. दिगवळे गावाला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. गावाच्या पूर्वेला सह्याद्रीच्या माथ्यावर इतिहास प्रसिद्ध भैरवगड आहे. येथील भैरी देवीचा ‘म्हाय उत्सव’ प्रसिद्ध आहे. शिवकाळात स्वराज्य रक्षणासाठी या किल्ल्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती.
आज हा किल्ला साहसी पर्यटक व गिर्यारोहकांसाठी पसंतीचे ठिकाण आहे. ग्रामसरिता लोंढा नदीच्या काठी व सह्याद्रीच्या पर्वतरांगेच्या पायथ्याशी वसलेले श्री देव स्वयंभू व श्री देवी दिर्बादेवी मंदिरे एक जागृत देवस्थान म्हणून ओळखली जातात. ही दोन्ही मंदिरे धार्मिक पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी ग्रामस्थांचा प्रयत्न आहे. त्यासाठी पायाभूत सुविधा निर्मितीची कामे सुरू आहेत. श्री देव स्वयंभू मंदिराची भव्यदिव्य वास्तू उभारण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला असून त्यासाठी दात्यांनी मदत करण्याचे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे. येत्या काही वर्षात श्री स्वयंभू मंदिर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे धार्मिक पर्यटन स्थळ बनेल असा विश्वास ग्रामस्थांना आहे.
श्री स्वयंभू मंदिराची रचना प्राचीन वास्तुशास्त्रावर आधारीत आहे. महाशिवरात्री दिवशी सकाळी सूर्यकिरणे गाभार्यातील थेट शिवपिंडीवर पडतात. या दिवशी सकाळी 7 ते 7.30 वा. या कालावधीत काही मिनिटांसाठी हा नयनरम्य किरणोत्सव पाहता येतो. हा अविष्कार कायम रहावा यासाठी मंदिराचा जिर्णोद्धार करतानाही त्याच्या मूळ आराखड्याला धक्का लागणार नाही याची दक्षता घेतलेली आहे.
स्वयंभू असलेल्या या मंदिराची निर्मिती कधी झाली? याची निश्चित माहिती उपलब्ध नाही. मात्र श्री स्वयंभू-दिर्बादेवी मंदिर ट्रस्टकडे उपलब्ध असलेल्या एका ताम्रपटानुसार 11 व्या शतकात तत्कालीन कुडाळ प्रांताचा राजा भैरव याने या मंदिराच्या जिर्णा ेद्धारासाठी आर्थिक मदत केल्याचा उल्लेख आहे. यानुसार हे मंदिर किमान हजार वर्ष े पुरातन असल्याचा ठोस पुरावा आहे. या मंदिराशेजारील विहिरीच्या तळातून धातूसदृश्य ध्वनी निर्माण होतो. ही विहिर वनवासात असताना पांडवांनी खोदल्याची अख्यायिका आहे.
श्री देव स्वयंभू मंदिराची वास्तू जीर्ण झाल्याने मंदिर नव्याने उभारण्याचा संकल्प श्री देव स्वयंभू-दिर्बादेवी चव्हाटा कमिटीने व दिगवळे ग्रामस्थांनी केले आहे. यासाठी भाविक व शिवभक्तांनी सढळहस्ते मदत करण्याचे आवाहन देवस्थान कमिटी, उत्सव समिती व दिगवळे ग्रामस्थांनी केले आहे.