मुरबाड शहर : किशोर गायकवाड
मुरबाड शहराच्या मुख्य तीनहात नाक्यावर, महापारेषण विभागाच्या शेजारी असलेल्या घाण आणि दुर्गंधीच्या साम्राज्यात उभारण्यात आलेला तथाकथित राज्यातील सर्वात मोठा ध्वजस्तंभ आज मुरबाडकरांसाठी अभिमानाचा नव्हे तर प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा जिवंत पुरावा ठरत आहे. घाईघाईने उद्घाटन करून मोठा गवगवा करण्यात आलेल्या या ध्वजस्तंभाची अवस्था अवघ्या काही महिन्यांपासून अक्षरशः दयनीय झालेली पाहायला मिळत आहे.
अर्धवट काम असतानाच उद्घाटनाचा सोहळा उरकण्यात आला. मात्र ही घाई नेमकी कशासाठी होती? याचे उत्तर आजतागायत मुरबाडकरांना मिळालेले नाही. उद्घाटनानंतरही काम पूर्ण झालेले नसून आजही अर्धवट आणि निकृष्ट काम स्पष्टपणे दिसून येत आहे.
ध्वजस्तंभाच्या परिसरात तुटलेले बांधकामाचे भाग, फुटलेले कडप्पे, तुटलेले लोखंडी साहित्य, निखळून पडलेले लादी फलक यांचा अक्षरशः खच पडलेला आहे. ध्वजाच्या पायथ्याला सध्या अनावश्यक साहित्याचे स्टोरेज रूम बनल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. शोभेसाठी बसविण्यात आलेल्या सिंहांच्या पुतळ्यांवर इतका धुळीचा थर साचला आहे की ते सिंह आहेत की दगड, हेच ओळखू येत नाही.
ध्वजस्तंभाच्या संरक्षण चौथऱ्याची तर अक्षरशः पडझड सुरू झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत असून, ही बाब गंभीर सुरक्षेचा प्रश्न निर्माण करणारी आहे. भटकी जनावरे रात्रीच्यावेळी याभागात ठाण मांडून असल्याचे बोलले जाते. एवढेच नव्हे तर ध्वजाची स्थितीही अत्यंत वाईट झाल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने केल्या जात आहेत.
या ध्वजस्तंभाच्या दुर्दशेबाबत याआधीही अनेक वेळा माध्यमांतून बातम्या प्रसारित झाल्या. मात्र प्रशासनाने नेहमीप्रमाणे कानाडोळा केल्याचे चित्र आहे. आता अवघ्या काही दिवसांवर प्रजासत्ताक दिन येऊन ठेपला आहे. कदाचित त्या दिवशी देशप्रेमाच्या नावाखाली प्रशासनाला या ध्वजाची आठवण होईल, झटपट डागडुजी केली जाईल आणि सोहळा पार पडेल. त्यानंतर मात्र पुन्हा ‘जैसे थे’ अशीच परिस्थिती राहील, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

लाखो रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेला हा ध्वजस्तंभ नेमका कुणाच्या मर्जीने आणि कुणाच्या फायद्यासाठी इतक्या घाईत उभारण्यात आला, हा खरा प्रश्न आहे. स्थानिक नेत्यांच्या मर्जीतील ठेकेदाराकडून हे काम करण्यात आल्याची चर्चा उघडपणे रंगू लागली आहे. देशाचा राष्ट्रध्वज हा अभिमान, सन्मान आणि एकतेचे प्रतीक आहे. मात्र मुरबाडमध्ये त्याच राष्ट्रध्वजाच्या स्तंभावरून प्रशासनाची बेपर्वाई, निकृष्ट कामकाज आणि दिखाऊ देशप्रेम उघडे पडले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला तरी प्रशासन याची दखल घेणार का, की मुरबाडकरांनी अशाच निष्काळजीपणाला सवयीचे मानायचे, हाच खरा सवाल आहे.