Murbad highway sinking pudhari photo
ठाणे

Murbad highway sinking : सावधान! मुरबाडचा नवा राष्ट्रीय महामार्ग ठिकठिकाणी खचतोय?

धानिवली पुलालगत लांब भेग ; चालकांमध्ये भीतीचे वातावरण

पुढारी वृत्तसेवा

मुरबाड शहर : किशोर गायकवाड

मुरबाड तालुक्यातील धानिवली गाव हद्दीतील मुरबाडी नदीवरील नव्या पुलालगत मुरबाडहून कल्याणकडे जाणाऱ्या मार्गावरील काँक्रीट रस्त्याला पहिल्याच जोरदार पावसात मोठी भेग पडून रस्त्याचा भाग नदीच्या दिशेने खचल्याचे समोर आले आहे. शनिवारी सकाळी ही बाब निदर्शनास येताच या घटनेचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रत्यक्ष पाहणीत रस्त्याच्या कडेला लांबलचक भेग पडल्याचे दिसून आले. या भेगांमध्ये दगडी ग्रीट टाकून त्या झाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे हा केवळ तात्पुरता उपाय असून मूळ समस्या कायम असल्याची चर्चा सुरू आहे. स्थानिकांच्या मते, पुलालगतचा संरक्षणात्मक काँक्रीट भाग अद्याप पूर्ण झालेला नसल्याने तसेच भरावाच्या बाजूचा आधार कमकुवत झाल्याने रस्त्याचा भाग खचल्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र याबाबत अधिकृत तांत्रिक अहवाल अद्याप समोर आलेला नाही.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरील कामांबाबत गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने विविध त्रुटी समोर येत आहेत. अवघ्या दोन दिवसांपूर्वी मोरोशी परिसरातही महामार्गाचा भाग खचल्याची घटना घडली होती. आता मुरबाड शहरालगतच अशी घटना घडली. दरम्यान, रस्त्यालगत बसविलेल्या धातूच्या संरक्षक कठड्याचा पाया खचल्यासारखा असल्याने भीती व्यक्त होत आहे.

उच्चस्तरीय चौकशीची मागणी

नागरिकांनी संबंधित राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या घटनेची स्वतंत्र तांत्रिक चौकशी करून रस्त्याच्या दर्जाची प्रयोगशाळा चाचणी करावी, दोषपूर्ण भाग तातडीने हटवून तांत्रिक निकषांनुसार नव्याने बांधावा आणि काम पूर्णपणे सुरक्षित असल्याची खात्री झाल्याशिवाय अंतिम मान्यता अथवा ठेकेदाराचे बिल अदा करू नये, अशी मागणी केली आहे. महामार्गावरील सातत्याने समोर येणाऱ्या त्रुटींमुळे संबंधित यंत्रणा आणि ठेकेदाराच्या कामकाजाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी आता अधिक जोर धरत आहे.

मुख्य रस्त्यालगतची साइडपट्टी ठेकेदाराने मुरूम ऐवजी काँक्रीट मटेरीयलने बनवल्याने त्यामध्ये पाणी जिरून काँक्रीट सरकला. पाऊस संपल्यावर तेवढा भाग नव्याने बनविण्यात येईल. सध्या वाहतुकीला काही अडचण नाही. पुढील १० वर्षे ठेकेदाराकडे महामार्गाचे मेंटेनन्स असल्याने ते काम करून घेण्यात येईल.
गौरव सूर्यवंशी, राष्ट्रीय महामार्ग ६१ अभियंता

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT