Murbad Malshej Highway: मुरबाड-माळशेज महामार्गावर नवा सिमेंट रस्ता; मात्र जुन्या पुलांमुळे जीव धोक्यात Pudhari
ठाणे

Murbad Malshej Highway: मुरबाड-माळशेज राष्ट्रीय महामार्गावर जीवघेणा प्रवास; जुन्या पुलांमुळे जीव धोक्यात

26 किमी खड्डेमुक्त प्रवासाचा दिलासा, पण नादुरुस्त पुलांमुळे अपघाताची भीती; नागरिकांची कारवाईची मागणी

पुढारी वृत्तसेवा

टोकावडे : मुकेश शिंदे

मुरबाड-माळशेज राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू असून दिवसाला हजारो वाहने या रस्त्यातून ये - जा करतात. अवजड वाहनांसह छोट्या मोठ्या गाड्या देखील या रस्त्यातून येतात. सातत्याने वाहनांची वर्दळ असणाऱ्या कदमपाडा ते टोकावडे सावर्णे या राष्ट्रीय महामार्गाच्या डांबरीकरण रस्त्याचे रूपांतर आता सिमेंन्ट क्राँक्रीटीकरण रस्त्यात झाले आहे. कदमपाडा ते सावर्णे हा 26 किमीचा रस्ता पूर्णत: सिमेंट रस्ता बनला आहे. त्यामुळे वाहन चालक व प्रवाशांना काहीसे खड्डेमुक्त जीवन जगायला मिळणार आहे. मात्र एकीकडे रस्ता जरी प्रवाशांच्या सेवेसाठी अथवा वाहनांसाठी सुखकर झाला असला तरी तो जीवघेणा देखील तेवढाच ठरणार असल्याचे दिसून येत आहे.

गेल्या अनेक वर्षापासून कल्याण मुरबाड टोकावडे माळशेज आळेफाटा राष्ट्रीय महामार्ग 61 हा रस्ता डांबरीकरण म्हणून ओळखला जायाचा. याच रस्त्यातून बारा महिने माळशेज घाटाचे सौंदर्य पाहण्यासाठी पर्याटक आपल्या कुटंबासोबत फिरायला येत होते. त्यामुळे वाहन चालक व प्रवाशी तसेच पावसाळी येणारे पर्यटक यांना डांबरीकरणाच्या रस्त्यात पडलेल्या खड्ड््यांचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. मुरबाडपासून थेट माळशेज घाटाच्या पायथ्यापर्यंत डांबरी रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडत असल्याने सातत्याने अपघाताची मालिका सुरू असायची. त्यामुळे हा रस्ता कुठे तरी जीवघेणा ठरत होता.

मागील वर्षापासून कदमपाडा ते थेट सावर्णे हा रस्ता डांबरमुक्त होत असून सिमेंन्ट क्राँक्रीटकरणाचा रस्ता म्हणून ओळखला जाणार आहे. त्यामुळे यावर्षी कदमपाड्यापासून ते सावर्णेपर्यंत या रस्त्यावर एक ही खड्डा दिसणार नसल्याने वाहन चालकांसह नागरिकांचा प्रवास अगदी सुखकर होणार आहे, यात मात्र तिळमात्र शंकाच नाही.

कदमपाडा ते सावर्णेपर्यंत या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी शासनाने कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून सिमेंन्ट क्राँक्रीटीकरण रस्ता तयार करण्याचे काम हाती घेऊ न रस्त्याचे काम मार्गी लावत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जात असतांना अधिकाऱ्यांनी मात्र या रस्त्यावर असणाऱ्या काही जुन्या दगडांच्या पुलांना प्राधान्य देऊ न त्यावरच क्राँक्रिटीकरणाच्या कामाचा घाट सुरू केला आहे.

काही वर्षांपूूर्वी बांधण्यात आलेले या रस्त्यावरील तीन पूल हे नादुरुस्तीच्या अवस्थेत आहेत. या पुलांचे लोखंड हे सडलेल्या अवस्थेत असल्याचे पहावयास मिळत आहे. या पुलांचे दोन्ही बाजूचे खालचे पिलर हे दगडांचे आहेत. शिवाय वरील भाग हा क्राँक्रीटीकरणाचा आहे.

अनेक ठिकाणी भेगादेखील पडल्या असून काही ठिकाणी दगड निघाले असल्याचे दिसत आहेत. त्यामुळे कदमपाड्यापासून माळशेज हा राष्ट्रीय महामार्ग प्रवाशांना व वाहन चालकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागणार आहे. त्यामुळे शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून काँक्रीटीकरण रस्ता हा नव्याने जरी तयार केला असला तरी या रस्त्यावरील पूल मात्र आजही जुन्याच आणि अत्यंत धोकादायक अवस्थेत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

पुलांची अवस्था भयावह

नवीन रस्ता चकचकीत, मजबूत आणि सुरक्षित असल्याचा दावा केला जात असताना, त्याच मार्गावरील पुलांची अवस्था मात्र भयावह आहे. अनेक ठिकाणी पुलांवर तडे गेलेले, लोखंडी सळ्या उघड्या पडलेल्या आणि संरचनेची मजबुती संशयास्पद झालेली दिसून येते. परिणामी, वाहनचालकांना नव्या रस्त्याचा फायदा होत असला तरी पुलांवरून जाताना भयानक परिस्थती उद्भवत असल्याचा अनुभव येणार यात मात्र शंका नाही.

कारवाईची मागणी

सर्वात गंभीर बाब म्हणजे, नवीन रस्ता उभारला असताना या रस्त्यावर खूप वर्षापुर्वीचे दगडांचे पूल आहेत. एवढा निधी खर्च होत असतांना अधिकाऱ्यांनी काही पुलांचे किंवा पुनर्बांधणी का केली नाही, असा सवाल या ठिकाणी केला जात आहे, त्यामुळे वाहन चालकांना व नागरिकांना आजही जुन्याच पुलांवरून आपला प्रवास करावा लागणार आहे.

हा प्रकार केवळ निष्काळजीपणाचाच नव्हे, तर थेट नागरिकांच्या जीवाशी खेळ असल्याचा आरोप संतप्त नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे मुरबाड-माळशेज राष्ट्रीय महामार्गावरील काही पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट, धोकादायक पुलांची पुनर्बांधणी न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तसेच बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT