Crocodile Rescue Pudhari
ठाणे

Crocodile Rescue: मासले तलावातील 26.5 किलो वजनाची मगर पकडण्यात अखेर यश

ही मगर सुरक्षितपणे पकडण्यात आली असून तिची वैद्यकीय तपासणी करून नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाने दिली.

पुढारी वृत्तसेवा

किशोर गायकवाड

मुरबाड शहर: मुरबाड तालुक्यातील मासले (बेलपाडा) हद्दीतील तलावात गेल्या दोन वर्षांपासून वास्तव्य करणारी मगर अखेर ठाणे वनविभागाने यशस्वीरीत्या पकडली आहे. ही मगर सुमारे सहा फूट लांबीची व अंदाजे 26.5 किलो वजनाची आहे. ही मगर सुरक्षितपणे पकडण्यात आली असून तिची वैद्यकीय तपासणी करून नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाने दिली.

ही कारवाई उपवनसंरक्षक सचिन रेपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहाय्यक वनसंरक्षक तुषार काळभोर यांच्या सूचनेनुसार राबविण्यात आली. वनपरिक्षेत्र अधिकारी संजुदास राठोड मुरबाड, पश्चिम व महेशकुमार शिंदे मुरबाड, पूर्व यांच्या नेतृत्वाखाली बचाव मोहीम यशस्वी झाली. प्राप्त माहितीनुसार, मासले तलावाचे क्षेत्रफळ सुमारे साडेसहा एकर असून, विस्तीर्ण परिसरामुळे मगर पकडणे यापूर्वी शक्य होत नव्हते.

मागील वर्षी पावसाळा लवकर सुरू झाल्याने प्रयत्न अपूर्ण राहिले होते. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या शर्तीच्या प्रयत्नांदरम्यान ही मगर तलावालगत असलेल्या जुन्या विहिरीच्या खड्ड्यात आढळून आली. यावेळी संधी साधत वनविभागाने तात्काळ कारवाई करून बचाव मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली.

या मोहिमेत मानद वन्यजीव रक्षक पवन शर्मा (मुंबई) व अविनाश हरड (मुरबाड) तसेच त्यांच्या सहकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. वनविभागाच्या पथकातील सुनील वडेकर (वनपाल), राजेंद्र खाडे, दीपक पतंगराव, सुरज मातोळे, योगेश देशमुख (वनरक्षक) यांच्यासह इतर कर्मचारी व वनमजूरांनीही मोठी भूमिका बजावली. याशिवाय बेलपाडा येथील ग्रामस्थ, विशेषतः तरुणांनीही या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवला.

दरम्यान, या घटनेच्या निमित्ताने मासले तलावातील जैवविविधतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. वन्यजीव रक्षक अविनाश हरड यांनी, मासले तलाव हा अत्यंत सुंदर जलाशय असून रामसर दर्जाच्या निकषांना पात्र ठरू शकतो. मात्र गेल्या काही वर्षांत त्याची स्थिती खालावत चालली आहे. या जैवविविधतेच्या संरक्षणासाठी शासनाने तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT