Monsoon Planning Pudhari
ठाणे

Monsoon Planning: मान्सूनपूर्व कामांचा आयुक्तांनी घेतला आढावा

लोकप्रतिनिधींशी समन्वय साधत प्रत्येक प्रभागात कामे करण्याचे निर्देश

पुढारी वृत्तसेवा

ठाणे: मान्सून पूर्व कामे वेळेत पूर्ण व्हावीत तसेच महापालिका कार्यक्षेत्रात पावसाळ्यात नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे. नालेसफाई, गटार स्वच्छता, खड्डे बुजविणे, धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी, तसेच स्ट्रीट लाईट दुरुस्ती, शहरातील सखल भाग, तसेच पाणी साचणाऱ्या ठिकाणांवर विशेष लक्ष ठेवून आपत्कालीन परिस्थितीत तातडीने उपाययोजना करता येतील यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना आयुक्त सौरभ यांनी आज झालेल्या बैठकीत सर्व विभागांना दिल्या.

नागरी संशोधन केंद्र येथे झालेल्या बैठकीस अतिरिक्त आयुक्त 1, संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, सर्व उपायुक्त, सर्व सहायक आयुक्त व विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते. नागरिकांच्या समस्या थेट समजून घेण्यासाठी आणि कामांमध्ये पारदर्शकता राहण्यासाठी नगरसेवकांचा सहभाग महत्त्वाचा आहे.

त्यामुळे प्रत्येक विभागाने नालेसफाईचे नियोजन करताना स्थानिक लोकप्रतिनिधींशी समन्वय साधावा, असेही आयुक्त सौरभ राव यांनी नमूद केले. तसेच शहरातील रेल्वे कलव्हर्टची सफाई नालेसफाईबरोबरच समांतर पद्धतीने करण्यात यावी, असेही निर्देश बैठकीत देण्यात आले.

मान्सून कालावधीत पंपिंग स्टेशन, आपत्कालीन यंत्रणा आणि संबंधित विभागांमध्ये समन्वय ठेवून कामे करण्यात यावीत. प्रत्येक विभागाने आपल्या कार्यक्षेत्रात पाहणी करून प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, असेही आयुक्तांनी नमूद केले.

मान्सून काळात कोणत्याही प्रकारची आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी मनुष्यबळ आणि साधनसामग्री उपलब्ध होईल यादृष्टीने नियोजन करावे. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सतर्क राहून नागरिकांना दिलासा मिळेल, याची काळजी घ्यावी, असेही आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केले.

आजपासून संपूर्ण घोडबंदर रस्ता हा फेरीवाला मुक्त करण्याचे निर्देश संबंधित उपायुक्त व सहायक आयुक्तांना यावेळी देण्यात आले माजिवडा, मानपाडा, वर्तकनगर या परिसरात रात्री उशिरापर्यत अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर संपूर्ण मान्सून संपेपर्यत दैनंदिन कारवाई सुरू राहिली पाहिजे असेही आयुक्तांनी नमूद केले.

कंट्रोल रूम सज्ज ठेवावा

मान्सून कालावधीत सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी नियंत्रण कक्ष (कंट्रोल रूम) अधिक सक्षम करण्यात येणार असून, आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या आहेत. तसेच प्रभागसमिती निहाय नियंत्रण कक्ष तयार करण्याच्या सूचनाही संबंधित सहायक आयुक्तांना देण्यात आल्या. मान्सून काळात नागरिकांना कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागू नये, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करून वेळेत कामे पूर्ण करावीत. मान्सून कालावधीत सर्व अधिकाऱ्यांनी आपले भ्रमणध्वनी सुरू ठेवावेत असे आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केले.

रस्त्यांची कामे 31 मे पर्यंत पुर्ण करावीत

घोडबंदर रोडवर रस्त्यांची कामे सुरू आहेत, याबाबत शहरातील रस्ते व खड्डे दुरुस्तीच्या कामांबाबत एमएमआरडीए, मेट्रो व इतर शासकीय संस्थांसोबत समन्वय साधून सुरू असलेली कामे 31 मे पर्यंत पूर्ण करण्याबाबत समन्वय साधावा, जर कामे अपूर्ण राहणार असतील तर कामे आटोपून रस्त्यावरील बांधकाम साहित्य उचलून रस्ते नागरिकांसाठी सुरळीत करावेत याबाबत सर्व यंत्रणांना संबंधितांनी सूचित करावे असे आयुक्तांनी नमूद केले.

खड्ड्यांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही व्हावी यासाठी यासाठी प्रत्येक विभागात समन्वय अधिकारी नेमावा नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींना जलद प्रतिसाद देऊन खड्डे बुजविण्याची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

शहरातील सखल भागांची यादी तयार करावी

शहरातील प्रत्येक विभागातील सखल लो-लाईंग एरियाची स्वतंत्र यादी तयार करून त्या ठिकाणी तातडीने उपाययोजना राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नाले व गटारांची नियमित सफाई, साचलेल्या गाळाचे काढकाम (डिसिल्टिंग) आणि आवश्यक ठिकाणी अतिरिक्त उपाययोजना कराव्यात.

प्रत्येक प्रभागात पाणी साचण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी हायड्रा मशीन, पंपिंग यंत्रणा व मनुष्यबळ सज्ज ठेवावे. तसेच, पाणी तुंबू नये यासाठी नियोजनपूर्वक कृती आराखडा (प्लॅन) तयार करून त्याची अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT