ठाणे : निवडणुकाजवळ आल्या कि मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, अशी आवई विरोधकांकडून उठवली जाते अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठा पक्षावर केली आहे. केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन अशाप्रकारची आवई उठवली जात असून कोणाचा बाप आली तरी मुंबई तोडू शकणार नाही, याचा पुनरुच्चार पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही महायुतीच जिंकणार, असा विश्वास देखील उपमुख्यामंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
मुंबईचे माजी नगरसेवक रामदास कांबळे यांनी ठाण्यातील आनंद आश्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. मुंबई ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी समजत होते. मात्र निवडणुकीमध्ये जनतेने त्यांची जागा त्यांना दाखवून दिली. रस्त्याच्या दुरुस्तीसाठीही काही जनांची दुकाने सुरु होती.
मात्र मुंबई खड्डेमुक्त घोषणा करून सर्वच रस्ते काँक्रीटचे करण्यात आल्याने या सर्वांची दुकाने आता बंद झाली असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणुका आल्या तरच यांना मुंबईकरांची आठवण येते. आणि मग मुंबई तोडण्याची आवई उठवली जाते. मात्र कोणाच्या सात पिढ्या आल्या तरी,मुंबई कोणच तोडू शकणार नसल्याचे शिंदे यांनी सांगितले. आज सर्वसामान्य मुंबईकर मुंबईच्या बाहेर फेकला गेला आहे. याला जबाबदार कोण आहे, याचा विचार देखील होणे आवश्यक आहे. मात्र बाहेर गेलेल्या मुंबईकरांना पुन्हा मुंबईत आणण्याचे आमचे स्वप्न असून पुनर्विकासाच्या माध्यमातून आम्ही हे सर्व स्वप्न साकार करणार असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. मागणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही महायुती म्हणून आम्ही एकत्र लढणार असून यामध्ये महायुतीचाच विजय होणार असल्याचा विश्वास शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. मुंबईतील अनेक माजी लोकप्रतिनिधी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करत आहेत. त्यांच्या भागांतील प्रश्न त्यांनी मला यावेळी वाचून दाखवले असून त्यातील बहुतांश प्रश्न हे म्हाडा आणि एसआरए प्राधिकरणाची संबंधित असून ते आपण शासनाच्या माध्यमातून नक्की सोडवण्याचा प्रयत्न करू असे सांगून त्यांना आश्वस्त केले.
गेल्या अडीच वर्षाचा माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात, रस्त्यांचे काँक्रिटीकरण, मुंबईचे सुशोभिकरण, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, कॅशलेस वैद्यकीय सेवा, डीप क्लीन ड्राइव्ह असे अनेक उपक्रम आपण शहरात राबवले. कोस्टल रोड, अटल सेतू, महालक्ष्मी रेस्कोर्सच्या जागेवर तयार होणारे सेंट्रल पार्क असे अनेक प्रकल्प मार्गी लावले. त्याद्वारे मुंबईचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न आम्ही केला असून यापुढेही करत राहू, असे यावेळी बोलताना नमूद केले.