Mumbra Train Accident 2025
ठाणे : सोमवारी सकाळी घडलेल्या मुंब्रा रेल्वे अपघाताबाबत आता मंगळवारी सकाळपासून दोन वेळा रेल्वे पोलिसांच्या वरिष्ठ अधिकार्यांसह पोलीस पथकाने मुंब्रा रेल्वे स्थानक आणि अपघात स्थळाच्या दोन रेल्वे ट्रॅकमधील अंतर आणि प्लॅटफॉर्मच्या उंचीचे मोजमाप केले. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी सदर तपास सुरु करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर अपघतानंतर संभावित अपघाताच्या वळणावर लोकल आणि एक्स्प्रेस यांचा वेग मंदावल्याचे चित्र आहे.
सोमवारी अपघातानंतर मंगळवारी रेल्वे पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त शिरसाठ यांनी स्वतः रेल्वे रूळांवर उतरून मुंब्रा स्थानकाच्या जवळच्या रेल्वे ट्रॅकचे मोजमाप घेतले.
ज्या दोन रुळांवरून लोकल धावते, त्यामधील अंतर तसेच कल्याणकडे जाणार्या आणि मुंबईकडे येणार्या दोन रेल्वे ट्रॅकमधील अंतर याचे मोजमाप केले.
त्याशिवाय मुंब्रा स्थानकामध्ये प्लॅटफॉर्मची उंची, लोकल ते प्लॅटफॉर्म यांच्यामधील अंतर, तसेच प्लॅटफॉर्म येथे असलेल्या रेल्वे रुळाच्या लगत असलेल्या प्लॅटफॉर्मची आणि रेल्वे रूळ यांच्यातील अंतराचेही मोजमाप करून त्याचे टिपण करण्यात आले. कल्याणकडे जाणार्या आणि मुंबईकडे जाणार्या मार्गावरील ट्रॅकची चाचपणी करण्यात आली.
लोकलची वेगमर्यादा अधिक असल्याने की, अतिभारामुळे झुकलेल्या लोकलमुळे अपघात झाला याचा शोध घेण्यासाठी दोन रुळांमधील अंतर मोजण्यात आले. अपघातात पडलेल्या प्रवाशांच्या बॅग, घड्याळ, चप्पल अशा वस्तू रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतल्या.
मुंब्रा रेल्वे अपघाताबाबत रेल्वे पोलिसांकडून तपासकार्य सुरु असतानाच रेल्वे प्रशासनाने अपघताबाबत ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात एडीआर (आकस्मिक अपघात) नोंद केली आहे. अपघातानंतर दुसर्या दिवशीही काही घटना घडल्या, तर रेल्वे वेळापत्रकही काही अंशी कोलमडले होते.