

ठाणे : उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत असताना मध्य रेल्वेच्या अनेक स्थानकांवर फलाटावरील पत्रे काढून दीर्घकाळ काम अपूर्ण ठेवण्यात आल्याने प्रवाशांचे हाल सुरू आहेत. ठाणे, डोंबिवली, भांडुप आणि मुलुंड या गर्दीच्या स्थानकांवर शेड नसल्याने प्रवाशांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. तापमान 35 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले असताना प्रवाशांना तासनतास उन्हात उभे राहावे लागत आहे. ज्यामुळे त्यांचे प्रचंड हाल होत आहेत.
रेल्वे प्रशासनाने विविध स्थानकांवर फलाटावरील पत्रे काढण्याचे काम हाती घेतले आहे. मात्र, हे काम पूर्ण करण्यास लागणारा विलंब प्रवाशांसाठी त्रासदायक ठरत आहे. ठाणे स्थानकातून रोज सुमारे 5 लाख प्रवासी प्रवास करतात, तर डोंबिवलीत 3 ते 4 लाख प्रवासी स्थानकात ये-जा करतात. यातील बहुतांश प्रवासी नियमित प्रवास करणारे आहेत. मात्र, आता त्यांना रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा फटका बसत आहे.
मध्य रेल्वेवरील ठाणे, डोंबिवली, मुलुंड, भांडुप ही स्थानके गर्दीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहेत. या स्थानकांवरील फलाट क्रमांक 1, 9 आणि 10 येथे पत्रे काढण्यात आली असून, काम रखडले आहे. भांडुपमध्येही फलाट क्रमांक 1, 3 आणि 4 वरील पत्रे काढून महिन्यांहून अधिक काळ झाला आहे. मात्र, अद्याप पत्रे पुन्हा बसवली गेलेली नाहीत. परिणामी, प्रवाशांना तासनतास उघड्यावर उभे राहावे लागत आहे. विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी प्रवास करणार्या नोकरदार आणि विद्यार्थ्यांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे.
प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, अन्यथा याविरोधात प्रवाशांनी आवाज उठवला, तर प्रशासनाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. तरी रेल्वे प्रशासनाने लवकरात लवकर छताची कामे पूर्ण करावी आणि प्रवाशांना उन्हाच्या झळांपासून संरक्षण द्यावे, अशी सर्वसामान्य प्रवाशांची मागणी आहे.
पावसाळा अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे. जर वेळीच ही कामे पूर्ण झाली नाहीत, तर पुढील काही महिन्यांत प्रवाशांना आणखी त्रास सहन करावा लागेल. उन्हाळ्यात उन्हाचा त्रास तर आहेच, पण पावसाळ्यात जर ही कामे पूर्ण झाली नाहीत, तर प्रवाशांना पावसात भिजण्याची वेळ येईल. त्यामुळे प्रशासनाने त्वरित दखल घेऊन ही कामे वेळेत पूर्ण करावीत, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
रेल्वे स्थानकावर रातोरात फलाट उभारला जातो, मग काढलेले पत्रे पुन्हा बसवायला 6 महिने का लागतात? असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. ठेकेदारांकडून कामे संथ गतीने सुरू आहेत. काही ठिकाणी पत्रे काढून ठेवल्याने फलाटाची सुरक्षा धोक्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
फलाटावर सावली नसल्याने प्रवासी जेथे सावली मिळेल, तेथे गर्दी करत आहेत. परिणामी, काही भागांत चेंगराचेंगरीसारखी स्थिती निर्माण होत आहे. महिला प्रवासी आणि ज्येष्ठ नागरिक यांना उन्हाच्या झळांचा सर्वाधिक त्रास होत आहे. थांबण्यासाठी जागा मिळत नसल्याने अनेकजण उघड्यावर उभे राहत आहेत. काही प्रवाशांना चक्कर येण्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. डोंबिवली स्थानकात पादचारी पुलाच्या कामामुळे फलाटावरील आसने काढण्यात आली आहेत. त्यामुळे बसून थांबण्याचीही कोणतीही सोय नाही. उन्हाच्या झळा, गर्दी आणि फलाटावरील अपुर्या निवार्यांमुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.