MD drugs MP to Thane
ठाणे : मध्यप्रदेशातून ठाण्यात आणलेला तब्बल 13 किलो 629 ग्रॅम एमडी ड्रग्जची तस्करी मुंब्रा पोलीस पथकाने उघड केली आहे. या गुन्ह्यात पाच जणांच्या तस्कर टोळीला गजाआड करण्यात आले आहे. आरोपींच्या ताब्यातून तब्बल 27 कोटी 21 लाख 77 हजार 750 रुपये किंमतीचा एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आल्याची माहिती परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांनी दिली.
मुंब्रा येथे परप्रांतीय टोळी ड्रग्ज विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी मुंब्रा पोलीस पथकास मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने मुंब्रा परिसरातील बिलाल हॉस्पिटल जवळ सापळा रचला. यावेळी बासू उमरद्दीन सय्यद (रा. मुंब्रा) या एमडी ड्रग्ज विक्रेत्यास अटक करून त्याच्या ताब्यातून 23.5 ग्रॅम एमडी पोलिसांनी जप्त केला होता. या आरोपीस न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावल्यानंतर त्याच्या चौकशीतून हे एमडी ड्रग्ज मध्य प्रदेश येथून ठाण्यात विक्रीसाठी आणण्यात आल्याची माहिती समोर आली.
त्यानंतर मुंब्रा पोलिसांनी मध्य प्रदेश येथून ड्रग्ज मुंब्रा-ठाण्यात आणून विक्री करणाऱ्या रामसिंग अमरसिंग गुज्जर (40, मध्य प्रदेश) आणि कैलास शंभुलाल बलई (36, मध्य प्रदेश) या आणखी दोघांना अटक केली. या दोघांच्या ताब्यातून 7 कोटी 30 लाख 57 हजार रुपये किमतीचे 3 किलो 515 ग्रॅम एमडी जप्त करण्यात आली. अटकेतल्या दोघांची कसून चौकशी केली असता त्यांनी हे ड्रग्ज मध्य प्रदेशातल्या रतलाम येथून आणल्याची माहिती समोर आली.
मुंब्रा पोलिसांचे एक पथक थेट रतलाम जिल्ह्यात धडकले. तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने मुंब्रा पोलिसांनी मनोहरलाल रंगलाल गुज्जर व राजू उर्फ रियाज मोहम्मद सुलतान मोहम्मद मंसुरी या आणखी दोघा ड्रग्ज विक्रेत्यांना अटक करून त्यांच्या ताब्यातून तब्बल 19 कोटी 91 लाख रुपये किमतीचे 99 किलो 956 ग्रॅम एमडी जप्त केले. अशा प्रकारे या गुन्ह्यात पाच जणांना अटक करून एकूण 13 किलो 629 ग्रॅम एमडी पोलिसांनी जप्त केले.
जप्त केलेल्या एकूण एमडी ड्रग्जची किंमत 27 कोटी 21 लाख 77 हजार 750 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अटक आरोपी अट्टल गुन्हेगार असून त्यांच्यावर खून, अमली पदार्थ तस्करी असे गंभीर गुन्हे यापूर्वी दाखल असल्याची माहिती देखील मुंब्रा पोलिसांनी दिली.