Mumbra-Diva Bay: मुंब्रा-दिवा खाडीचा भूगोलच बदलतोय Pudhari News Network
ठाणे

Mumbra-Diva Khadi: मुंब्रा-दिवा खाडीचा भूगोलच बदलतोय; भूखंडाचे श्रीखंड खाण्यासाठी अनधिकृत भरावाचा खटाटोप?

Diva Todays Latest News: अनधिकृत भरावाचा मोठा घोटाळा : शेतकऱ्यांच्या हक्कांवर गदा, न्याय कोठे मिळणार?

पुढारी वृत्तसेवा

Mumbra Diva Illegal Construction News

सापाड ( ठाणे ) : मुंब्रा-दिवा परिसरातील खाडीजवळ सुरू असलेल्या अनधिकृत भरावामुळे मोठा पर्यावरणीय आणि सामाजिक प्रश्न उभा राहिला आहे. दिवा-मुंब्रा चुहा ब्रिज परिसरात खाडीत मोठ्या प्रमाणावर माती, बांधकामाचा राडारोडा व कांदळवनाचा रास करून सपाटीकरण करण्याचे काम सुरू असल्याचा गंभीर आरोप स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांनी केला आहे. यामुळे शेकडो एकरांवर असलेल्या शेतकऱ्यांच्या सातबाराच्या जमिनी बाधित होत असून शेतकऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या जमिनीवर जाण्यास देखील अडथळे निर्माण केल्याने येथील भूगोलच बदलत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे.

मुंब्रा-दिवा परिसराला लाभलेला विस्तृत खाडी किनारा हा शहरासाठी नैसर्गिक श्वासमार्ग आहे. मात्र रातोरात शेकडो गाड्यांनी सुरू असलेल्या अनधिकृत भरावामुळे हा श्वासमार्गच नष्ट होण्याची भीती आहे. पीडित शेतकरी गणेश पाटील यांनी सांगितले की, खाडीपट्ट्यातील मोठ्या क्षेत्रावर पत्रे मारून तेथील वाटा, प्रवेशमार्ग बंद करण्यात आले आहेत. या पत्र्यांच्या आत मूळ सातबाराधारकांची जमीन येत असूनदेखील शेतकऱ्यांनाच प्रवेशास बंदी घालण्यात आला आहे. आमच्या पिढ्यानपिढ्यांच्या जमिनी आहेत. मात्र आज आम्हालाच आमच्या सातबाराच्या जमिनीवर जाण्यास मनाई केली जाते. पत्र्यांच्या आत कोणते काम चालते हे आम्हालादेखील कळू देत नाहीत. जमीन खाडीपट्ट्यांत असल्याने पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रात अनधिकृत भराव केल्यास मोठा धोका संभवतो, असे तज्ज्ञही मत आहेत.

दरम्यान, याचिकाकर्ते गणेश पाटील यांनी या संदर्भात संबंधित विभागांना वारंवार निवेदने दिली असून पर्यावरण विभाग, मनपा, पोलीस, महसूल विभाग यांकडे तक्रारी दाखल आहेत. तरीही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने ते आता उच्च न्यायालयात अवमान याचिका देखील दाखल केली असल्याचे त्यांनी सांगितले.

खाडीमध्ये बेकायदेशीरपणे माती टाकली जात आहे. न्यायालयाचे आदेश आहेत तरी महापालिका अधिकारी, तहसीलदार, प्रांत अधिकारी, अगदी पोलीसदेखील कारवाई करण्यास टाळाटाळ करतात. इतका राजकीय दबाव असल्यास आम्ही न्याय कोणाकडे मागायचा? भरावाबाबत न्यायालयाने स्पष्ट आदेश दिले असून, कोणत्याही प्रकारचा भराव किंवा पर्यावरणीय हानी करणारे काम तात्काळ थांबवण्याचे न्यायालयाने निर्देश दिले आहेत. तरीही हे काम वेगाने सुरूच आहे.
महेश पाटील, पर्यावरण प्रेमी
आमच्यावर अन्याय झाला आहे. भराव थांबवण्याची मागणी केली म्हणून माझं घर पाडलं, व्यवसाय उद्ध्वस्त केला. आमच्या सातबाराच्या जमिनीवर जाण्याचा अधिकारसुद्धा हिरावला गेला. आम्ही न्याय कोणाकडे मागायचा? उच्च न्यायालयाचे आदेश असूनही अधिकारी निष्क्रिय आहेत. हा भराव राजकीय संरक्षणाशिवाय शक्य नाही. पर्यावरणाचा नाश, कांदळवनाची कत्तल आणि खाडी भूखंडात रुपांतरित करण्याचा प्रयत्न चालू आहे. आम्ही हा प्रकार थांबेपर्यंत लढा देणार आहोत.
गणेश पाटील, पीडित शेतकरी

भूखंडाचे श्रीखंड खाण्यासाठी खटाटोप

स्थानिकांचा आरोप आहे की हा भराव कोणत्यातरी शक्तिशाली राजकीय दबावगटाच्या सहाय्यानेच चालू आहे. खाडीमध्ये मोठ्या प्रमाणावर माती टाकून भूखंड निर्माण करण्याची प्रक्रिया जलदगतीने सुरू असून, त्यामागे राजकीय पाठबळ असल्यानेच प्रशासन कारवाई टाळत असल्याची चर्चा आहे. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे सातबाराधारक शेतकरी गणेश पाटील यांनी या अनधिकृत भरावाला विरोध करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्या राहत्या घरावर महापालिकेने कारवाई केली. त्यांच्या व्यवसायावरही कारवाई करून त्यांना आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्यात आल्याचा गंभीर आरोप पाटील यांनी केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT