Mumbai Vadodara Expressway pudhari photo
ठाणे

Mumbai Vadodara Expressway : मुंबई-बडोदा वेगवान महामार्ग आता दृष्टिक्षेपात

बदलापूर-पनवेल दरम्यानच्या टनेलचे काम पूर्ण, कधी खुला होणार?

पुढारी वृत्तसेवा

मुंब्रा :महामुंबईतील रायगड जिल्ह्यातील पनवेल आणि ठाणे जिल्ह्यातील बदलापूर या दोन महत्त्वाच्या शहरांचे अंतर अवघ्या २० मिनिटांवर आणणाऱ्या मुंबई-दिल्ली महामार्गाच्या मुंबई-बडोदे टप्प्यातील तलासरी-पनवेल विभागाचे काम आता अंतिम टप्प्यात आहे.

या महामार्गादरम्यान असलेल्या बदलापूर-पनवेल या दोन शहरांना जोडणाऱ्या बोगद्याचे काम आता पूर्ण झाले आहे. यामुळे पालघर जिल्ह्याला गतिमान दळणवळणाचे नवे दालन उपलब्ध होणार आहे.

प्रकल्पातील तलासरी ते पनवेल या १५० किलोमीटर टप्प्याचे काम भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या ठाणे विभागाच्या देखरेखीखाली सध्या सुरू आहे. या मार्गावर अंबरनाथ तालुक्यातील बदलापूरजवळील बेंडशीळ गावाबाहेर डोंगरात पनवेलला जाण्यासाठी ४.१६ किलोमीटर लांबीचा बोगदा खोदण्यात आला आहे. या महामार्गामुळे बदलापूरहून पनवेलला अवघ्या २० मिनिटांत जाता येणार आहे.

पुढील दोन महिन्यांत हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे. सध्या बदलापूर-पनवेल दरम्यानच्या प्रवासासाठी किमान सव्वा तास लागतो. या रस्त्यामुळे नवी दिल्ली ते मुंबई हे अंतर १२ तासांत पार करणे शक्य होणार आहे. माथेरान इको-सेन्सिटिव्ह झोनला यामुळे नुकसान झालेले नाही.

या प्रस्तावित महामार्गामुळे देशभरातून जेएनपीटी बंदराकडे येणाऱ्या आणि जाणाऱ्या अवजड वाहनांची थेट वाहतूक होऊन महामुंबईतील ठाणे, नवी मुंबई, डोंबिवली, कल्याण शहरांदरम्यान भेडसावणारी वाहतूक कोंडीची समस्या मिटेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

महामार्गाच्या प्रकल्पापैकी बदलापूरजवळील बॅडशीळ गावाजवळून पनवेल तालुक्यात जाणाऱ्या ४.१६ किलोमीटर बोगद्याचे काम नुकतेच पूर्ण झाले. बोगद्यातील रस्त्याची किरकोळ कामे महिनाभरात पूर्ण होतील. आतापर्यंत या महामार्गाचे ९२ टक्के काम पूर्ण झाले आहे.

महामार्ग होणार गतिमान

१२० मीटर रुंदीच्या या रस्त्याच्या एकूण आठ मार्गिकेचा हा सर्वाधिक मोठा महामार्ग असल्याने पालघरवरून मुंबईला येण्‍यासाठी एक जलद मार्ग मिळणार आहे. याचा फायदा तलासरी, डहाणू, पालघर, वसई या तालुक्यांना होणार आहे. त्याचबरोबर वाडा, बदलापूर या भागांनाही जलद वाहतुकीची सेवा उपलब्ध होईल. प्रत्येकी २५ किलोमीटर अंतरावर महामार्गावर जाण्यासाठी तसेच बाहेर पडण्यासाठी मार्गिका असतील. ठाणे जिल्ह्यात भिवंडी, कल्याणजवळील रायता आणि बदलापूरजवळील जुईली गावाजवळ महामार्गावर जाण्याची सोय असेल. त्यामुळे त्या-त्या भागातील नागरिकांची सोय होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT