ठाणे: मुंबई आणि ठाण्यातील रिक्षाचालकांनी विविध मागण्यांसाठी १ डिसेंबरपासून संपाचा इशारा दिल्याने राज्य सरकारने या प्रश्नाची दखल घेतली आहे. रिक्षाचालकांच्या मागण्यांवर चर्चा करून सकारात्मक तोडगा काढण्यासाठी येत्या २६ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता मुंबईतील परिवहन कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीत रिक्षाचालक संघटनांच्या सर्व मागण्यांवर सविस्तर चर्चा केली जाणार असून, संपाचा मार्ग न स्वीकारता चर्चेतून प्रश्न सोडवावेत, असे आवाहन राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे. दरम्यान बेकायदा बाईक टॅक्सी सेवांवर कठोर कारवाईचे संकेत परिवहन मंत्र्यांनी दिले आहे.
एकता रिक्षा टॅक्सी चालक-मालक सेनेने केलेल्या मागण्यांच्या अनुषंगाने ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनाही निमंत्रित करण्यात येणार आहे.
रिक्षाचालकांचे प्रश्न हे कोणत्याही एका राजकीय पक्षापुरते मर्यादित नसून सर्व संघटनांनी एकत्र येऊन त्यावर चर्चा करावी, अशी सरकारची भूमिका असल्याचे सरनाईक यांनी नमूद केले. विरोधी पक्षांशी संबंधित संघटनांनीही संपाची भूमिका घेतली असली, तरी सर्वांनी चर्चेच्या माध्यमातून मार्ग काढावा, असे आवाहन त्यांनी केले.
रिक्षाचालकांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असून, कायद्याच्या चौकटीत राहून परिवहन मंत्री म्हणून उपलब्ध अधिकारांचा योग्य वापर करून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र, प्रवाशांच्या हिताकडेही दुर्लक्ष करता येणार नाही, असा इशाराही सरनाईक यांनी दिला.
रिक्षाचालकांनी प्रवाशांशी सन्मानपूर्वक वर्तन करणे अपेक्षित असून, भाडे नाकारणे, मीटरपेक्षा जास्त भाड्याची मागणी करणे अथवा प्रवाशांशी अरेरावी करणे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित रिक्षाचालकांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
रिक्षाचालकांना न्याय देतानाच प्रवाशांचे हितही जपले गेले पाहिजे. बेकायदा बाईक टॅक्सी सेवांचा प्रश्न, रिक्षाचालकांच्या विविध मागण्या आणि प्रवाशांना मिळणारी सेवा या सर्व मुद्द्यांवर २६ नोव्हेंबरच्या बैठकीत चर्चा होणार आहे. त्यामुळे या बैठकीत काय निर्णय होतो आणि त्यानंतर रिक्षाचालक संघटना १ डिसेंबरचा संप मागे घेण्याबाबत काय भूमिका घेतात, याकडे मुंबई आणि ठाण्यातील प्रवाशांचे लक्ष लागले आहे.
शिंदे गटाची संपाला साथ नाही!
या आंदोलनाला राजकीय वळण मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शिवसेना (एकनाथ शिंदे) प्रणित एकता रिक्षा टॅक्सी चालक-मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन रिक्षाचालकांच्या मागण्यांचे निवेदन सादर केले.
या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी २६ नोव्हेंबर रोजी परिवहन मंत्र्यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती शिंदे गटाचे माजी नगरसेवक एकनाथ भोईर यांनी दिली.संयुक्त कृती समितीने संपाचा निर्णय घेताना सर्व रिक्षा संघटनांना विश्वासात घेतले नसल्याचा आरोप भोईर यांनी केला. रिक्षाचालकांच्या मागण्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे.
मात्र, सरकार चर्चेसाठी पुढाकार घेत असताना संपाचा आग्रह धरणे योग्य नाही. मागण्यांवर सकारात्मक निर्णय होत असतानाही काही संघटना संपावर ठाम राहिल्या, तर हा संप मोडीत काढू, असा इशाराही त्यांनी दिला.