टिटवाळा : टिटवाळा परिसरात पहाटेच्या शांततेला हादरा देणारी अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबई पोलीस दलातील हवालदाराने रेल्वे पुलाखाली गळफास घेत आत्महत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मृत पोलिसाचे नाव भाऊराव दगडू ढगे (वय 42) असे असून ते टिटवाळ्यातील पंचवटी परिसरातील गीतांजली बिल्डिंग, रूम क्रमांक 103 येथे वास्तव्यास होते. मूळचे अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कातळापूर येथील रहिवासी असलेले ढगे हे मुंबईतील येलोगेट पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून सेवा बजावत होते.
ढगे हे काल गावावरून परतले होते. मात्र, आज पहाटेच्या सुमारास टिटवाळ्यातील रेल्वे पुलाखाली त्यांनी गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले. सकाळी ही घटना उघडकीस येताच स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली आणि परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. टिटवाळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांनी दिली आहे.
या घटनेमुळे पोलीस दलातील वाढता ताण, मानसिक दबाव आणि कामाच्या स्वरूपावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. कर्तव्य बजावत असताना अशा प्रकारे आयुष्य संपवण्याचा निर्णय का घ्यावा लागला, याबाबत चर्चा सुरू झाली असून सहकाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. टिटवाळा परिसरात या घटनेची सर्वत्र चर्चा सुरू असून नागरिकांमध्येही तीव्र भावना व्यक्त होत आहेत.