ठळक मुद्दे
मुंबई-नाशिक महामार्गवरील वाशाळा फाट्यावरील त्रुटीचे काम
बंद केलेल्या मुख्य रस्त्यावरील सिमेंटचे कठडे न दिसल्यामुळे दुचाकी कठड्यावर आदळली
एकच कुटुंबातील दोन तरुणाचा मृत्यू झाल्याने हळहळ
कसारा (ठाणे) : मुंबई-नाशिक महामार्गवरील वाशाळा फाट्यावरील त्रुटीमुळे काल (शनिवार) रात्री दुचाकीचा अपघात होऊन झालेल्या अपघातात 2 तरुण मयत झाले असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.
शनिवारी (दि.9) रात्री मुंबई-नाशिक लेनवरून दुचाकीने प्रवास करते वेळी दुचाकीचालकाला बंद केलेल्या मुख्य रस्त्यावरील सिमेंटचे कठडे न दिसल्यामुळे दुचाकी थेट त्या कठड्यावर जाऊन आदळली. या भीषण अपघातात 3 जणांना गंभीर दुखापत झाली त्यांना आपत्ती व्यवस्थापन टीम सदस्यांनी रुग्णालयात दाखल केले.
परंतु उपचारासाठी दरम्यान दोघांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी असून त्यावर नाशिक येथे उपचार सुरु आहेत. गणेश रामचंद्र झुगरे व विशाल लक्ष्मण झुगरे रा. लतीफवाडी, कसारा अशी मयत तरुणाची नावे असून प्रकाश कवटे रा. कसारा लतीफवाडी हा गंभीर जखमी असून त्याला नाशिक येथे एका रुग्णालयात दाखल करण्यात आले असून एकच कुटुंबातील दोन तरुणाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जातं आहे.
दरम्यान तरुणाच्या मृत्यूला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार कंपनी कारणीभूत असून ठेकेदार कंपनी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणवर गुन्हा दाखल करून मयत तरुणाच्या कुटुंबियांना मदत करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
यामार्गांवर बनवण्यात आलेला जोड रस्ता हा सिमेंटचा बनवण्यात आला आहे.परंतु निकृष्ठ दर्जाचा रस्ता बनवल्याने तो रस्ता पूर्णतः उखाडला असून यावर अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. या रस्त्यावर पूर्णतः चिखल, पाणी साचल्याने अनेक वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
महामार्गावर बाह्य वळणावर ठेकेदार कंपनीकडून कोणत्याही प्रकारची प्रवासच्या सुरक्षेसाठी काळजी घेण्यात आली नाही. सदर वळणावर या ठिकाणी मोठे सिमेंट कथडे उभे ठेवलेत. तात्पुरत्या स्वरूपात दिशा दर्शक सिग्नल बसवणे, हायमास्ट दिवे लावण्याची गरज होती परंतु असे न केल्यामुळे याठिकाणी रात्रीचे आपघातचे प्रमाण वाढले.