Vande Bharat Express Pudhari
ठाणे

Mumbai Madgaon Vande Bharat Express: मुंबई-गोवा वंदे भारत आता १६ डब्यांची; १० नोव्हेंबरपासून सहा दिवस धावणार

प्रवाशांसाठी १,१२८ आसने उपलब्ध, महिनाभरासाठी बदल

पुढारी वृत्तसेवा

मुंब्रा: मुंबई-कोकण-गोवा मार्गावरील प्रवाशांसाठी रेल्वेने दिलासादायक निर्णय घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगावदरम्यान धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस आता आठऐवजी १६ डब्यांसह धावणार आहे.

त्यामुळे या गाडीची प्रवासी आसनक्षमता ५३० वरून थेट १ हजार १२८ होणार आहे. येत्या १० नोव्हेंबरपासून हा बदल लागू होणार असून, आठवड्यातील सहा दिवस ही गाडी प्रवाशांच्या सेवेत असेल. मात्र, हा बदल तूर्तास एका महिन्यासाठी करण्यात आला आहे.

मान्सूनचे वेळापत्रक संपल्यानंतर कोकण रेल्वेवरील गाड्यांचे नियमित वेळापत्रक सुरू झाले आहे. त्यातच आगामी हिवाळी पर्यटन हंगाम आणि दिवाळीच्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर वंदे भारत एक्स्प्रेसची आसनक्षमता वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईहून कोकण आणि गोव्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे.

सध्या सीएसएमटी-मडगाव-सीएसएमटी मार्गावर धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस आठ डब्यांची आहे. प्रवाशांचा या गाडीला मोठा प्रतिसाद मिळत असल्याने आरक्षण सुरू होताच आसने भरतात. अनेकदा प्रतीक्षायादीतील तिकिटेही उपलब्ध होत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत होती.

विशेषतः सणासुदीच्या सुट्ट्या आणि पर्यटन हंगामात या गाडीला मोठी मागणी असते. त्यामुळे डब्यांची संख्या वाढविण्याची मागणी सातत्याने केली जात होती. रेल्वेच्या नियोजनानुसार, आठ डब्यांची सध्याची वंदे भारत एक्स्प्रेस ९ नोव्हेंबरला शेवटची फेरी पूर्ण करेल.

त्यानंतर ही गाडी देखभाल-दुरुस्तीसाठी पाठविण्यात येणार आहे. १० नोव्हेंबरपासून ट्रेन क्रमांक २२२२९/२२२३० सीएसएमटी-मडगाव-सीएसएमटी मार्गावर १६ डब्यांची वंदे भारत धावेल. या बदलामुळे प्रवासी आसनांची संख्या जवळपास दुप्पट होणार आहे.

अतिरिक्त आसनक्षमता उपयुक्त ठरणार

१) मुंबई-गोवा मार्गावर वंदे भारत सुरू झाल्यापासून प्रवाशांकडून तिला पसंती मिळत आहे. वेगवान प्रवास, आधुनिक सुविधा आणि आरामदायी प्रवासामुळे पर्यटकही या गाडीला प्राधान्य देतात. हिवाळी सुट्ट्या, नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी कोकण व गोव्याकडे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत असल्याने अतिरिक्त आसनक्षमता उपयुक्त ठरणार आहे.

२) या गाडीला कायमस्वरूपी १६ डबे मिळावेत, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. मध्य रेल्वेने ५ जून रोजी १६ डब्यांच्या गाडीसाठी रेल्वे मंडळाकडे प्रस्ताव पाठविला होता. मात्र, कायमस्वरूपी १६ डब्यांची गाडी उपलब्ध झालेली नसल्याने सध्या एका महिन्यासाठी हा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे रेल्वे मंडळाकडून कायमस्वरूपी १६ डब्यांची गाडी उपलब्ध करून दिल्यास मुंबई-कोकण-गोवा मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT