ठाणे : सुरेश साळवे मध्य रेल्वेची लोकल म्हणजे लाखो प्रवाशांची जीवनवाहिनी; मात्र याच लोकल प्रवासात प्रवाशांचा जीव आणि मालमत्ता दोन्ही धोक्यात आल्याचे चित्र आहे. गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी मोबाईल, बॅगा, पर्स आणि दागिन्यांवर डल्ला मारण्याचे सत्र सुरूच ठेवले आहे. सप्टेंबर महिन्यातील गेल्या ३ आठवड्यांत अवघ्या २२ दिवसांत मध्य रेल्वेच्या विविध लोहमार्ग पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मोबाईल, बॅग आणि पर्स चोरीचे तब्बल ५३६ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यातच ६० तक्रारी नोंदल्या गेल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ठाणे स्थानकातील गर्दीत एकाच दिवशी पाच मोबाईल चोरीला गेल्याच्या घटनाही अलीकडे समोर आल्या आहेत.
ठाणे, दिवा, मुंब्रा, कळवा ते कर्जतदरम्यानच्या लोकलमध्ये गर्दीच्या वेळी प्रवाशांच्या खिशातील किंवा हातातील महागडे मोबाईल चोरटे हेरतात. प्रवासी फलाटावर उतरतानाची किंवा गाडीत चढतानाची गर्दीही चोरट्यांसाठी आयती संधी ठरत आहे. नुकतेच दिवा स्थानकाच्या फलाट क्रमांक दोनवर लोकलमधून उतरून मोबाईलवर बोलणाऱ्या प्रवाशाचा मोबाईल हिसकावण्यात आला. ठाणे स्थानकातही चार प्रवाशांकडून पाच मोबाईल चोरीला गेल्याची नोंद झाली असून त्यांची किंमत सुमारे ७० हजार रुपये होती.
गर्दीमुळे प्रवासी लोकलमधून पडून जखमी होणे अथवा मृत्युमुखी पडण्याच्या घटनाही घडत आहेत. मुंब्रा-दिवा दरम्यान लोकलमधून पडण्याच्या घटनांमध्ये ९ जून २०२५ रोजी पाच जणांचा मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय २५ जुलै २०२६ रोजी अपंगांच्या डब्यातून प्राणाघातक शस्त्र घेऊन प्रवास करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी वेळीच अटक केली. त्यामुळे रेल्वे पोलीस आणि आरपीएफसमोर प्रवाशांची सुरक्षा राखण्याचे मोठे आव्हान कायम आहे. लोकलची गर्दी प्रवाशांसाठी सुविधा ठरण्याऐवजी चोरट्यांसाठी संधी ठरत असल्याने रेल्वे स्थानकावरील सुरक्षा यंत्रणा अधिक प्रभावी करण्याची गरज निर्माण झाली आहे.
एकाच वेळी पाच प्रवाशांचे मोबाईल चोरीला
ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात नुकत्याच दाखल झालेल्या तक्रारीमध्ये पाच प्रवाशांचे तब्बल २ लाख २१ हजार रुपये किमतीचे मोबाईल चोरीला गेल्याचे समोर आले आहे. दुसरीकडे, एक्स्प्रेसमधूनही मोबाईल आणि मौल्यवान वस्तू चोरीच्या घटना सुरू आहेत. नुकत्याच एक्स्प्रेसमधील चोरीच्या प्रकरणात मोबाईल आणि लॅपटॉप चोरीबरोबरच त्या मोबाईलमधील बँक खात्याचा वापर करून पैसे लंपास केल्याचे प्रकरण समोर आले होते.