राजेश जागरे
शहापूर: यंदाच्या दमदार पावसाने मुंबईची तहान भागवणारी धरणे तुडुंब भरली असून, भातसा, मोडकसागर आणि तानसा धरणांनी शंभर टक्के जलसाठा गाठला आहे.
दोन्ही धरणांतून नियंत्रित स्वरूपात पाण्याचा विसर्ग सुरू झाला असून, मध्य वैतरणा धरणातील जलसाठाही झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षभराच्या पाणीपुरवठ्याबाबत मुंबईकरांची चिंता पूर्णपणे दूर झाली असून, महापालिकेलाही मोठा दिलासा मिळाला आहे.
रविवार, २६ जुलै रोजी दुपारी २ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार मोडकसागर धरणाची पाणीपातळी १६३.१५६ मीटर इतकी नोंदविण्यात आली असून, ती पूर्ण जलसाठा क्षमतेपर्यंत पोहोचली आहे. धरणातील उपयुक्त जलसाठा १२९.६२ दशलक्ष घनमीटर असून धरण १०० टक्के भरले आहे.
धरणाचा पाचवा दरवाजा चार फूट उघडण्यात आला असून, ३,९५६ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. भातसा धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाल्याने शनिवारी (दि. २५) दुपारी १ वाजता धरणाचे पाचही वक्रद्वार प्रत्येकी ०.२५ मीटरने उघडण्यात आले. यानंतर भातसा नदीपात्रात ८६.७६५ क्युसेक (३०६४.१०६ क्युसेक्स) पाण्याचा नियंत्रित विसर्ग सुरू करण्यात आला असून, मुंबईसाठी ही दिलासादायक घडामोड मानली जात आहे.
तानसा धरणातही शंभर टक्के जलसाठा उपलब्ध असून, धरणातील उपयुक्त साठा १४५.०८ दशलक्ष घनमीटर आहे. धरणाचे सहा दरवाजे उघडे ठेवण्यात आले असून, तेथून ६,६३१.५६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
दरम्यान, मध्य वैतरणा धरणाची पातळी २८०.६२ मीटर इतकी झाली असून, धरणात ८६.५६ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. धरणाच्या परिसरात गेल्या २४ तासांत ४० मिमी पावसाची नोंद झाली असून, पाणीपातळीत ०.४४ मीटरची वाढ झाली आहे. मात्र, अद्याप धरणाचे दरवाजे बंद ठेवण्यात आले असून कोणताही विसर्ग करण्यात आलेला नाही.
मध्य वैतरणा लवकरच भरणार
धरण क्षेत्रात सुरू असलेला पाऊस कायम राहिल्यास मध्य वैतरणा धरणही लवकरच पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
एकूणच मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख धरणांमध्ये मुबलक जलसाठा उपलब्ध झाल्याने आगामी काळातील पाणीटंचाईची शक्यता जवळपास संपुष्टात आली आहे. मुंबई महापालिकेच्या जलपुरवठा विभागाकडून धरणांतील पाणीपातळी आणि विसर्गावर सातत्याने लक्ष ठेवले जात असून, आवश्यकतेनुसार पुढील निर्णय घेतले जाणार आहेत.
कोणत्या भागांची तहान भागवतात ही धरणे?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोडकसागर, तानसा आणि मध्य वैतरणा धरणांतील पाणी मुंबई महापालिकेच्या जलवाहिनी जाळ्याद्वारे शहर व उपनगरांमध्ये पोहोचवले जाते.
दक्षिण मुंबई : कुलाबा, फोर्ट, भायखळा, दादर, माटुंगा, धारावी, मलबार हिल आदी परिसर.
पूर्व उपनगर : कुर्ला, घाटकोपर, भांडुप, मुलुंड, चेंबूर, गोवंडी आदी भाग.
पश्चिम उपनगर : वांद्रे, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरीवली, दहिसर परिसर.
जलशुद्धीकरण कुठे?
धरणांमधील पाणी प्रथम भांडुप जलशुद्धीकरण संकुलात तसेच पांजरापोळ जलशुद्धीकरण केंद्र येथे शुद्ध केले जाते. त्यानंतर महापालिकेच्या जलवाहिन्यांद्वारे संपूर्ण मुंबईत वितरित केले जाते.या मुख्य संकुलांव्यतिरिक्त, मुंबईमध्ये वापरलेल्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी पालिकेद्वारे कुलाबा, वरळी, धारावी, वांद्रे, घाटकोपर, भांडुप आणि मालाड अशा ७ वेगवेगळ्या भागांत मलजल प्रक्रिया केंद्रेदेखील चालवली जात आहेत.