ठाणे: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी महाराष्ट्रातील पहिला स्टील पूल ठाणे जिल्ह्यातील भिवंडीच्या दिवे-अंजूर गावाजवळ नाशिक महामार्गावर यशस्वीपणे प्रक्षेपित करण्यात आला.
१०० मीटर लांब आणि १,४०५ मेट्रिक टन वजनाचा हा पूल आहे. बुलेट ट्रेन मार्गावर एकूण २८ स्टील पूल प्रस्तावित असून, त्यापैकी १६ पुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या पुलाची स्टील संरचना दिवे-अंजूरपासून सुमारे १,३०० किलोमीटर अंतरावरील तामिळनाडूतील त्रिची येथील कार्यशाळेत तयार करण्यात आली.
त्यानंतर ती ट्रेलरद्वारे भिवंडीत आणून जागेवर जोडणी करून स्थापित करण्यात आली. पुलाच्या निर्मितीत अत्याधुनिक तांत्रिक मानकांनुसार कटिंग, ड्रिलिंग, वेल्डिंग आणि पेंटिंग करण्यात आले. प्रत्येक स्टील बॅचची अल्ट्रासोनिक तपासणीही करण्यात आली.
महामार्गावरील वाहतुकीला कमीतकमी अडथळा निर्माण व्हावा, यासाठी रात्रीच्या वाहतूक बंदीदरम्यान पुलाचे प्रक्षेपण करण्यात आले. पुलाची उंची १४ मीटर असून, टिकाऊपणा आणि कंपन नियंत्रणासाठी विशेष यंत्रणा व बेअरिंग्जचा वापर करण्यात आला आहे. हा पूल देशातील स्वदेशी तांत्रिक क्षमतेचे उदाहरण ठरत आहे.