मुरबाड शहर : मुरबाड तालुक्यातील मोरोशी येथील शासकीय आश्रमशाळेत कार्यरत असलेले मुख्याध्यापक प्रल्हाद भोई आणि स्त्री अधिक्षिका जयश्री वाघाडे यांना कर्तव्यात कसूर व प्रशासकीय अनियमिततेच्या आरोपांखाली तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. याबाबतचे अप्पर आयुक्त यांचे पत्र तहसीलदार यांनी सोशियल मीडिया मार्फत प्रसारित केले आहे.
शाळेतील मुलींच्या वसतिगृहात राहणाऱ्या इयत्ता दहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीने गळफास लावून जीवन संपवल्याची गंभीर घटना गुरुवारी पहाटे समोर आली होती. त्यानुसार नातेवाईक व आदिवासी पक्ष संघटना यांनी आक्रमक भूमिका घेत कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार प्रकल्प अधिकारी दिवाकर काळपांडे यांनी आदिवासी विकास विभागाचे ठाणे येथील अप्पर आयुक्त यांना मुख्याध्यापक प्रल्हाद भोई आणि स्त्री अधिक्षिका जयश्री वाघाडे यांच्या निलंबनासाठी पत्र पाठविले होते. त्यानुसार शुक्रवारी तातडीने कारवाई होऊन अप्पर आयुक्त गोपीचंद कदम यांच्या सहीचे आदेश काढण्यात आले.
सदर आदेशात, संबंधित अधिकाऱ्यांविरोधात प्राप्त झालेल्या तक्रारींची प्राथमिक चौकशी करण्यात आली असता, सदर प्रकरणात गंभीर स्वरूपाच्या बाबी निदर्शनास आल्याने सक्षम प्राधिकरणाने ही कारवाई केल्याचे नमूद करण्यात आले आहे.
निलंबन कालावधीत संबंधित अधिकाऱ्यांनी मुख्यालयाच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये, तसेच चौकशी प्रक्रियेस पूर्ण सहकार्य करावे, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. या प्रकरणी सखोल विभागीय चौकशी करण्यात येणार असून दोषी आढळल्यास पुढील कठोर कारवाई केली जाण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.
या घटनेमुळे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व वसतिगृह व्यवस्थेवर परिणाम होऊ नये, यासाठी तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी व्यवस्था करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, या कारवाईमुळे तालुक्यातील शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.