KDMC Pudhari
ठाणे

KDMC mayor election : मनसेने भाजपाचा काढला वचपा

महापौर पदासाठीच्या मॅजिक फिगरसाठी शिवसेनेला दिला पाठिंबा

पुढारी वृत्तसेवा

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक फोडाफोडीच्या राजकारणाने प्रचंड गाजली. भाजपने दबावतंत्राचा वापर करीत मनसेचे निवडणूक रिंगणातील उमेदवारासह चक्क शहर प्रमुखाला उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची वेळ आणून बिनविरोध निवडीचा सिलसिला सुरू ठेवला होता. हे शल्य मनसेच्या मनात खोलवर रुजले होते. त्यामुळे भाजपा विरोधात मनसेत बदल्याची आग धूसमुसत होती. केडीएमसी महापौर पदाच्या निवडणूकीसाठी मॅजिक फिगरच्या जुळवाजुळवीत मनसेने शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा देत भाजपाने मनसे सोबत केलेल्या राजकारणाचा बदला घेतला आहे.

केडीएमसी निवडणूक जाहिर होताच भाजपने त्यांच्या पक्षात विविध पक्षातील माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते फोडण्याचा धडाका लावला होता. निवडणूकीची प्रक्रिया सुरु होताच मनसेच्या महिला जिल्हाध्यक्ष मंदा पाटील यांना भाजपने प्रवेश दिला. पाटील यांना भाजपने उमेदवारी दिली. तसेच जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांना सुद्धा पक्षात घेत त्यांना भाजपकडून उमेदवारी दिली.

सगळयात मोठा कहर म्हणजे मनसेचे शहर प्रमुख मनोज घरत हे भाजप उमेदवार महेश पाटील यांच्या विरोधात उभे होते. घरत यांना भाजपने माघार घेण्यास भाग पाडल्याने भाजपचे महेश पाटील हे बिनविरोध निवडून आले. निवडणूकीत भाजपने मनसे फोडली. कल्याण-डोंबिवलीत भाजपने मनसेला खिंडार पाडले.

ही सल मनसेच्या मनी खोलवर होती. भाजपने केलेले राजकारण हे मनसेच्या जिव्हारी लागले होते. त्यामुळे शिंदे सेनेला मनसेने पाठिंबा देत भाचपचा वचपा काढला आहे. मनसेने शिंदे सेनेला पाठिंबा देत भाजपने मनसेसोबत केलेल्या राजकारणाचा सगळा हिशोब चुकता करुन टाकला आहे. मनसेने शिंदे सेनेला दिलेल्या पाठिंब्याची राजकारणात जोरदार चर्चा आहे.

केडीएमसीमध्ये शिवसेना-भाजपा महायुतीला दिलेल्या पाठिंब्याबाबत अखेर मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांची महत्त्वाची भूमिका मांडली आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील सध्याच्या राजकीय परिस्थितीत स्थिरता राखण्यासाठीच मनसेने महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असून, हा निर्णय कोणत्याही वैयक्तिक स्वार्थातून घेतलेला नाही.

राज ठाकरेंनी मुभा दिली म्हणूनच हा निर्णय घेतला असल्याचे मत राजू पाटील यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले आहे. काही वेळापूर्वीच शिवसेनेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी मनसेच्या या पाठिंब्याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर मनसे नेते राजू पाटील यांच्या प्रतिक्रियेकडे लक्ष लागले होते.

अंबरनाथची पुनरावृत्ती होऊ नये यासाठीच हा निर्णय

युतीबाबत मनसे नेते पाटील म्हणाले, आम्ही शिवसेना ठाकरे गटासोबत निवडणूक लढलो, मात्र त्यांचे इथले काही नगरसेवक गायब झाले. या सर्व प्रकाराला केडीएमसीतील जनता आता कंटाळली आहे. अंबरनाथची पुनरावृत्ती होऊ नये यासाठीच हा निर्णय घेतला आहे. हा निर्णय स्वतःच्या स्वार्थासाठी नसल्याचेही राजू पाटील यांनी स्पष्ट केले. तर मनसे अध्यक्षांच्या भूमिकेचा उल्लेख करत ते म्हणाले, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार आम्हाला दिले होते. त्या अधिकाराचा वापर करून परिस्थितीचा विचार करत हा निर्णय घेतला आहे. तसेच पाच नगरसेवकांच्या माध्यमातून आम्ही जनतेला न्याय देऊ शकतो का, हा प्रश्न आमच्यासमोर होता. त्यामुळे केवळ विरोधासाठी विरोध न करता, स्थिर प्रशासन आणि विकासासाठी योग्य तो निर्णय घेणे आवश्यक होते, असेही पाटील यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT