ठाणे : शहरातील वाहतूक कोंडीच्या विरोधात शनिवारी मोर्चा काढणाऱ्या मनसेने मोर्व्यापूर्वीच आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री १२ पूर्वी अवजड वाहनांना घोडबंदर महामार्गावर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. मात्र निर्णयाच्या अंमलबजावणी वरून साशंक असलेल्या मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी रात्री १२ पूर्वी या भागात अवजड वाहने आल्यास ही वाहने फोडण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न अधिक तापण्याची चिन्हे आहेत.
ठाण्यात आणि विशेष करून घोडबंदर पट्ट्यात होणाऱ्या वाहतूक कोंडीवरून सध्या प्रशासकीय यंत्रणांना रोजच टीकेचे धनी व्हावे लागत आहे. दररोजच्या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक अक्षरशः त्रस्त झाले असून जस्टीस फॉर घोडबंदर संस्थेने एकदा शांततेत तर एकदा रस्ता रोको करत आंदोलन केले होते. दुसरीकडे मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी देखील या वाहतूक कोंडीच्या विरोधात शनिवारी मोर्चा काढणार असल्याचे जाहीर केले आहे. मनसेकडून मोर्चाची तयारीही जोरदारपणे सुरू आहे. या आंदोलनामुळे शहरात पुन्हा वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे मनसेच्या मोर्यापूर्वीच मंगळवारी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री १२ पूर्वी घोडबंदर महामार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. मात्र याची अंमलबजावणी होईल की, नाही याबाबत मनसे नेते अविनाश जाधव हे साशंक आहेत.