टिटवाळा : टिटवाळ्यात आरोग्य व्यवस्थेतील धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून अन्न व औषध प्रशासन विभागाने येथील एका रुग्णालयावर छापा टाकून तब्बल ५.१६ लाख रुपये किमतीची बेकायदेशीर औषधे जप्त केली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, या रुग्णालयातील परवानाधारक मेडिकल स्टोअर स्थलांतरित झाल्यानंतरही रुग्णालयाने बेकायदेशीररीत्या औषधांचा साठा ठेवला होता. गुप्त माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने ही कारवाई केली. तपासात ही सर्व औषधे वैध परवाना नसताना साठवण्यात आली होती. जी औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० अंतर्गत गंभीर गुन्हा ठरतो.
ही कारवाई औषध निरीक्षक राजश्री शिंदे आणि डोईफोडे यांनी केली. संपूर्ण कारवाईवर परिमंडळ ४ चे सहायक आयुक्त राजेश पं. चौधरी तसेच सह आयुक्त, कोकण विभाग व्ही. टी. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली टाकण्यात आलेला छापा यशस्वीपणे पार पडला. या प्रकरणी पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
छाप्यावेळी रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर औषधसाठा असल्याचे स्थानिकांना आढळून आले. मात्र जप्तीत दाखवलेल्या औषधांचा आकडा कमी असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. या घडामोडीनंतर टिटवाळ्यात अवैधरीत्या औषधांचा व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून स्थानिक नागरिकांमध्ये प्रशासनाच्या कारवाईचे स्वागत केले जात आहे.