Thane Electricity Supply Demand
डोंबिवली : टोरंट कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात ठाणे जिल्हावासिय ग्राहकांकडून तीव्र नापसंती व्यक्त करण्यात येत आहे. भिवंडीत वारंवार उसळणारे जनआंदोलन आता कल्याण-डोंबिवलीच्या ग्रामीण भागात सरकण्याची दाट शक्यता आहे. वीज ग्राहकांच्या संतापाचा कडेलोट होण्याआधीच मुंबईच्या धर्तीवर भिवंडी, दिव्यासह कल्याण-डोंबिवलीच्या ग्रामीण भागासाठी विद्युत कंपन्यांचा पर्याय उपलब्ध करून देण्यात यावा, याकडे मनसेचे नेते तथा माजी आमदार राजू पाटील यांनी निवेदनाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले आहे.
भिवंडी लोकसभा मतदारसंघातील वीज ग्राहकांना हैराण केलेल्या टोरंट कंपनीच्या विरोधात आता कल्याण लोकसभा मतदारसंघातील ग्राहक देखील आक्रमक झाले आहेत. या मतदारसंघातील दिवा विभागासह १४ गावांमध्ये टोरंट कंपनीकडून वीज पुरवठा केला जात आहे. मात्र ग्राहकांनी या कंपनीच्या विरोधात आगमनाच्या पहिल्या दिवसापासून विरोध दर्शविला आहे. वितरीत होणारी अवाढव्य विद्युत बिले, विरोध करणाऱ्या ग्राहकांवर होणाऱ्या पोलिसी कारवायांसह कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत.
कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील दिवा, कळवा शहरासह परिसराला लागून असलेल्या १४ गावांना कंपनीच्या अनागोंदी कारभाराचा सर्वाधिक फटका बसू लागला आहे. त्यामुळे या कंपनीला पर्याय उपलब्ध करून देण्यात यावा, अशी अपेक्षा मनसेचे नेते तथा माजी आमदार राजू पाटील यांनी त्यांच्या निवेदनातून व्यक्त केली आहे.
कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात जेव्हापासून टोरंट कंपनीने प्रवेश केला तेव्हापासून वीज ग्राहकांनी कंपनीबद्दल तीव्र नापसंती दर्शविली आहे. विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर कंपनीच्या विरोधातील ठाण्यातल्या भूमिपुत्रांच्या आंदोलनात आपण सहभाग घेतला होता. पाच वर्षांपासून ठाणे जिल्ह्यात टोरंट कंपनीला पर्याय उपलब्ध करून देण्याची आपण मागणी करत आहोत. मात्र ठाकरे सरकारनंतर शिंदेच्या सरकारने देखील मनसेची ठाणे जिल्ह्यातल्या वीज ग्राहकांची ही महत्वाची मागणी मान्य केली नाही.
त्यामुळे आता राज्याचे पालकत्व असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हावासियांची मागणी मान्य करावी, असेही राजू पाटील यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे.समस्त वीज ग्राहकांच्या भावना मनसेचे नेते तथा माजी आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचविल्या आहेत. आता मुख्यमंत्री यावर काय निर्णय घेतात ? याकडे टोरंट कंपनीच्या कारभारामुळे त्रस्त झालेल्या वीज ग्राहकांच्या नजरा लागल्या आहेत.
* ग्राहकांच्या समस्या तातडीने सोडविण्यात येतील
* कंपन्यांचे प्रत्येकाचे स्वतंत्र युनिट प्रमाणे दर असणार
* कंपन्यांकडून नागरिकांना योग्य वागणूक दिली जाईल
* पर्याय उपलब्ध झाल्यास दबावशाहीतून मुक्तता होणार