कल्याण : महाराष्ट्र नवनिर्माण सेना कल्याण जिल्हा अध्यक्ष प्रकाश भोईर यांनी आपल्या पदाचा आणि पक्षाच्या सदस्याचा राजीनामा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे दिला आहे. निवडणुकीच्या तोंडावर भोईर यांच्या निर्णयावर सर्वांनी आश्चार्य व्यक्त केले आहे. केडीएमसी मध्ये प्रकाश भोईर व त्याची पत्नी सरोज प्रकाश भोईर हे दोघे भोईर पती-पत्नी पालिकेत लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आले होते. आता दोन्ही माजी नगरसेवक कोणत्या पक्षात प्रवेश करतात याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे.
गेल्या रविवारी 23 तारखेला डोंबिवली पश्चिमेकडील भूमीपूजनाच्या वेळी भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी प्रकाश भोईर हेही लवकरच वंदे मातरम म्हणतील असे म्हणाले होते. त्यामुळे याची शहरात चर्चा रंगली होती. भोईर यांच्या मनसे पक्षातून राजीनामा चर्चेनंतर भाजपा प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे भाकीत खरे ठरणार का ? अशी चर्चा सुरु आहे. भोईर यांच्या प्रवेशाची प्रतीक्षा आहे असेही बोलले जात आहे.
प्रकाश भोईर यांनी 2000 साली व 2005 साली शिवसेना पक्षातून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. 2010 सालाच्या पालिका निवडणुकीत त्यांनी शिवसेना पक्षाला सोडचिठ्ठी देत ते स्वतः व त्यांची पत्नी सरोज भोईर यांनी अपक्ष उमेदवारी लढविली होती. त्यात प्रकाश भोईर यांचा पराभव झाला होता तर त्यांची पत्नी सरोज भोईर या अपक्ष नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. 2015 सालच्या पालिका निवडणुकीत त्यांनी मनसे पक्षात प्रवेश करीत प्रकाश भोईर व त्यांची पत्नी सरोज भोईर हे भोईर दाम्पत्य मनसेच्या तिकिटावर निवडून आले होते.
2020 साली पालिकेतील लोकप्रतिनिधीचा कार्यकाळ संपल्या नंतर महापालिकेत तब्बल पाच वर्ष 2025 वर्ष प्रशासकीय राजवट होती. अखेरीस केडीएमसी निवडणुकीचे बिगुल वाजले असून 2026 च्या जानेवारी महिन्यात कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक होण्याची शक्यता आहे.
प्रभागनिहाय आरक्षण सोडत निघाल्यानंतर राज्य निवडणूक आयोग हे पालिकेच्या निवडणुकीची तारीख कधी जाहीर करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यातच मनसे कल्याण जिल्हा अध्यक्ष प्रकाश भोईर यांनी 28 तारखेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे जिल्हा अध्यक्षपदाचा आणि मनसे पक्ष सदस्याचा राजीनामा दिला आहे.