ठाणे : पुढारी वृत्तसेवा : 'हर हर महादेव' हा मराठी चित्रपटावरून मनसे आणि राष्ट्रवादीमध्ये सोमवारी रात्री झालेल्या राड्यानंतर मंगळवारी संध्याकाळी अखेर मनसेच्या वतीने या चित्रपटाचा शो मोफत लावून राष्ट्रावादीला आव्हान दिले. तर सोमवारी चित्रपट बघायला आलेला प्रेक्षक हा मद्यप्राशन करून आलेला नव्हता. तर राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते मद्यप्राशन करून आले होते, असा आरोप देखील ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला आहे. सोमवारच्या प्रकारानंतर विवियाना मॉल इथे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
मनसेच्या वतीने सुरवातीला एक स्क्रीन या सिनेमासाठी बुक करण्यात आली होती. मात्र, प्रेक्षकांची गर्दी वाढल्याने तीन स्क्रीन येथे बुक करण्यात आल्या. त्यानंतरही सिनेमागृहाबाहेर प्रेक्षकांची गर्दी दिसून आली. परंतु आलेल्या प्रत्येक प्रेक्षकाला हा सिनेमा दाखविला जाईल, असे आश्वासन यावेळी जाधव यांनी दिले. तर याठिकाणी मनसेचे देखील मोठय़ा संख्येने कार्यकर्ते हजर राहिल्याने त्यावर सवाल केला असता, अनुचित प्रकार घडू नये, यासाठीच हे कार्यकर्ते हजर राहिल्याचेही जाधव यांनी सांगितले.
राष्ट्रवादीचे आमदार आव्हाड यांनी सोमवारी रात्री १० वाजता विवियाना मॉल येथे आंदोलन करत प्रेक्षकांना बाहेर काढून हा शो बंद पाडला होता. यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी एका प्रेक्षकाला देखील मारहाण केल्याची घटना घडली. इतिहासाची मोडतोड करून हा चित्रपट दाखविला जात असल्याचा आरोप यावेळी आव्हाड यांनी केला होता. परंतु त्यानंतर मनसेने हा शो पुन्हा सुरु केल्याचे दिसून आले.
या चित्रपटात नेमके काय आहे, हे प्रेक्षकांना सुध्दा कळू दे, त्यांना देखील उत्सुकता आहे, या चित्रपटात नेमके काय आहे, त्यामुळे आम्ही हा शो मोफत लावला असल्याची माहिती जाधव यांनी दिली. यावेळी दोन स्क्रीन या महिलांनी भरल्या असल्याचेही त्यांनी सांगितले. इतिहास चुकीचा दाखविला असेल, तर त्यांनी कोर्टात जावे, सेन्सार बोर्डकडे जावे, अशी सुचनाही त्यांनी राष्ट्रवादीला केली. तर ज्या तरुणावर मद्यपी असल्याचा आरोप केला जात आहे, त्याचे सासरे लेखक आहेत, पत्नी पीएचडी होल्डर आहे. परंतु केवळ स्वत:ची कातडी वाचविण्यासाठी कोणाला तरी बदनाम करु नये, असा सल्लाही त्यांनी दिला. जे काही व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करीत आहात, जी काही बदनामी केली जात आहे, ती चुकीची असून, तुम्ही किती बदनाम आहात, हे माहित आहे, तुमचा इतिहासही किती बदनामीचा आहे, हे सांगण्याची वेळ आमच्यावर येऊ देऊ नका, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
हेही वाचलंत का ?