Kalyan Shilphata Road Traffic Issues
नेवाळी : कल्याण शिळ फाटा मार्गावरील मानपाडा चौकातील भीषण वाहतूक कोंडी, पावसाळ्यात सुरू असलेली खोदकामे, मेट्रो प्रकल्पातील नियोजनाचा अभाव आणि विविध शासकीय यंत्रणांमधील समन्वयाचा बोजवारा यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. हा प्रश्न दोन-चार दिवसांचा नसून अनेक वर्षांपासून नागरिकांना वेठीस धरणारा आहे. त्यामुळे केवळ पाहणी दौरे करून किंवा परस्परांवर आरोप-प्रत्यारोप करून प्रश्न सुटणार नसून राज्य सरकारने थेट हस्तक्षेप करून जबाबदार अधिकाऱ्यांचा जाब घ्यावा, अशी मागणी मनसेचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष हर्षद पाटील यांनी केली आहे. तसेच परिस्थितीत तातडीने सुधारणा न झाल्यास मनसे स्टाईलने आंदोलनाचा इशारा पाटील यांनी दिला आहे.
मानपाडा चौकातील वाहतूक कोंडीवर बोलताना त्यांनी मेट्रो प्रकल्पाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत."राज्यात सत्ता असताना मंत्रालयात बैठक घेऊन या प्रकल्पाचा सखोल आढावा घेणे आवश्यक आहे. मेट्रोचा डीपीआर नागरिकांसमोर स्पष्ट नाही, कामाचे नियोजन दिसत नाही आणि सुरक्षेच्या नियमांचे पालनही होताना दिसत नाही. संपूर्ण उन्हाळा हातातून जाऊ दिल्यानंतर आता पावसाळ्यातच मुख्य चौकात खोदकाम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून लाखो नागरिकांना रोज नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे," असा आरोप पाटील यांनी केला आहे.
यावेळी त्यांनी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांवरही थेट निशाणा साधला आहे."खासदार किंवा आमदारांवर आरोप करण्यापेक्षा मेट्रोच्या कामावर देखरेख करणारे अधिकारी कार्यालयात बसून नेमके काय करत आहेत? ठेकेदाराला मनमानी करण्याची मोकळीक कोणी दिली? कल्याण-शिळफाटा मार्गावर गेली वीस वर्षे हजारो कोटी रुपयांची कामे झाली, मात्र आजही सर्व्हिस रोड, बस-वे, पादचारी पूल यांसारख्या मूलभूत सुविधा अपूर्ण आहेत. मग जनतेचा पैसा नेमका खर्च झाला कुठे?" असा संतप्त सवाल पाटील यांनी उपस्थित केला आहे.
एमएसआरडीसीने डिव्हायडरमध्ये उभारलेल्या वीजखांबांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च झाल्यानंतर मेट्रोच्या कामासाठी तेच खांब लगेचच हटविण्यात आल्याचा उल्लेख करत त्यांनी हा जनतेच्या पैशांचा उघड अपव्यय असल्याचा आरोप केला आहे."एकीकडे नागरिक वाहतूक कोंडी, धूळ, चिखल आणि जीवघेण्या प्रवासाला सामोरे जात आहेत, तर दुसरीकडे नियोजनाच्या अभावामुळे कोट्यवधी रुपयांचा निधी वाया जात आहे. ही परिस्थिती तातडीने बदलली नाही तर मनसेचे नेते राजू पाटील यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन उभारले जाईल. त्यानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल," असा इशारा हर्षद पाटील यांनी दिला आहे.
महावितरणच्या कामकाजावरही पाटील यांनी टीका केली आहे. पावसाळ्याच्या काळातच वीजखांब हटविणे आणि भूमिगत केबल टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. घारीवली गावाजवळील एमजी रेसिडेन्सी परिसरात या कामामुळे तब्बल ४८ तास वीजपुरवठा खंडित झाला होता. मनसेचे उप जिल्हाध्यक्ष योगेश पाटील यांनी उभं राहून ते काम करून घेतलं आहे. कोणत्याही नियोजना शिवाय कामे करून नागरिकांना अडचणीत आणण्याचा हा प्रकार असून अशा अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे," अस पाटील म्हणाले आहेत.
भाजपचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी कल्याण ग्रामीणचे शिवसेना आमदार राजेश मोरे यांच्यावर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेवर प्रतिक्रिया देताना पाटील म्हणाले की, "तो त्यांचा अंतर्गत राजकीय विषय आहे. कोणाला लक्ष्य करायचे किंवा कोणासोबत जायचे हा त्यांचा निर्णय आहे. मात्र सर्वसामान्य नागरिकांना दररोज होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष करून राजकीय आरोप-प्रत्यारोप करण्यात कोणताही अर्थ नाही."