Open Drain Safety Issue Pudhari
ठाणे

Open Drain Safety Issue: मिरारोडमधील नाला महिनाभरापासून उघडाच

सुरक्षेची उपाययोजना न केल्याप्रकरणी ठेकेदार संस्थेवर कारवाईची मागणी

पुढारी वृत्तसेवा

भाईंदर: राजकीय वरदहस्त लाभलेल्या तसेच अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या मेसर्स जिजाऊ सामाजिक संस्थेला राजकीय आशीर्वादानेच मिरा-भाईंदर महापालिकेने मीरारोडच्या पूनम गार्डन येथील सालसर बिल्डिंग ते सॉलिसीटर बिल्डिंग 3 दरम्यानच्या नाल्याच्या बांधकामाचे कंत्राट दिल्यानंतर ठेकेदाराकडून 1 महिन्यापुर्वी नाल्याच्या खोदकामाला सुरुवात करण्यात आली.

मात्र नाल्याच्या बांधकामाला अद्यापही सुरुवात केली नसल्याने खोदलेला नाला सताड उघडा ठेवण्यात आला आहे. तसेच या उघड्या नाल्याच्या सभोवताली सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ठेकेदाराने कोणतीही उपाययोजना केली नसल्याने याप्रकरणी पालिकेने ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करून त्याचा ठेका रद्द करावा, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात आली आहे.

तसेच ठेकेदाराला राजकीय दबावापोटी पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर प्रशासकीय जबाबदारी व कर्तव्य पार पाडताना होणान्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2004 कलम 10 (2) (3) प्रमाणे, महायष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 चे कलम 4 व 5 अंतर्गत शिस्तभंगावी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी देखील करण्यात आली आहे.

नाल्याच्या बांधकामासाठी खोदकाम करूनही त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात न करता तो उघडाच ठेवण्यात आला आहे. त्याच्या सभोवताली सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कोणतीही उपाययोजना न केल्याने त्यात एखादी व्यक्ती पडून जिवीतहानी झाल्यास अथवा त्यात एखादे वाहन कोसळून अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न स्थानिकांकडून उपस्थित करण्यात आला आहे.

याच नाल्याला लागून निवासी इमारत, बँक, लहान मुलांचे प्री-स्कुल आहे. असे असतानाही पालिकेने ठेकेदाराला पाठीशी घालून नाल्याभोवती सुरक्षिततेचे उपाययोजना न करण्यासाठी त्याला अभय दिल्याचे यावरून दिसून येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

नाल्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करून तो बंदिस्त करण्याची मागणी स्थानिकांकडून होऊ लागली आहे. दिड महिन्यावर पावसाळा आला असताना नाल्याच्या बांधकामाला ठेकेदाराकडून अद्यापही सुरुवात करण्यात आलेली नाही. पावसाळ्यापूर्वी नाल्याचे काम पूर्ण न झाल्यास त्यातील घाण पाणी बाहेर पडून ते रस्त्यावर पसरून परिसरात दुर्गंधी पसरेल आणि रोगराईला आमंत्रण मिळेल, अशी भिती स्थानिकांकडून व्यक्त होऊ लागली आहे.

करदात्यांच्या पैशांचा मोठ्याप्रमाणात अपव्यय

यापूर्वी मेसर्स जिजाऊ सामाजिक संसंस्थेची अनेक कामे वादग्रस्त ठरली असून ती दर्जाहीन असल्याची पोलखोल देखील अनेकदा झालेली आहे. पालिका हद्दीतील काही सिमेंट रस्त्यांची कामे देखील या संस्थेला देण्यात आली असून त्यातील बहुतांशी रस्त्यांची कामे दर्जाहीन झाल्याने पालिकेने त्यांची कामे पुन्हा करून देण्याची नोटीस ठेकेदाराला बजावल्याचे निदर्शनास आले आहे.

अशा ठेकेदारांच्या दर्जाहीन कामांना राजकीय वरदहस्त लाभत असल्याने त्यात शहरातील करदात्यांच्या पैशांचा मोठ्याप्रमाणात अपव्यय होत आहे. त्यामुळे अशा ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून त्यांना कामे न देण्याची मागणी लोकांकडून होऊ लागली आहे.

गेल्या 1 महिन्यापासून नवीन नाल्याच्या बांधकामासाठी जुन्या नाल्याचे खोदकाम ठेकेदार मेसर्स जिजाऊ सामाजिक संस्थेकडून करण्यात आले आहे. कोणतेही खोदकाम करण्यापूर्वी त्याच्या सभोवताली सुरक्षिततेच्या अनुषंगाने लोखंडी पत्रे, सुरक्षिततेच्या सूचना देणारे फलक, फीत लावणे अपेक्षित असतानाही ठेकेदाराने तशी कोणतीही उपाययोजना केलेली नाही. तसेच काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपला असताना नाल्याच्या कामाला अद्यापही सुरुवात करण्यात आलेली नाही. याबाबत पालिकेकडे अनेकदा पत्रव्यवहार करूनही पालिकेने त्याकडे दुर्लक्ष करून ठेकेदाराला पाठीशी घातले आहे. पालिकेने ठेकेदाराच्या या लापर्वाही विरोधात त्याच्यावर दंडात्मक कारवाई करून त्याचा ठेका रद्द करावा.
नितीन नाईक, सामाजिक कार्यकर्ता

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT