Crime News pudhari photo
ठाणे

Thane Crime : मिरा रोडमध्ये देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश

१३ वर्षीय बालिकेसह दोघांची सुटका; महिला दलालासह साथीदार गजाआड

पुढारी वृत्तसेवा

मिरा रोड : मिरारोड येथील शीतलनगर परिसरात सुरू असलेल्या देह व्यवसायाच्या आंतरराज्यीय रॅकेटचा गुन्हे शाखेच्या महिला अत्याचार प्रतिबंधक व विशेष बालकांचे संरक्षण आणि काळजी कक्षाने पर्दाफाश केला आहे.

या कारवाईत एका महिला दलालासह तिच्या पुरुष साथीदाराला बेड्या ठोकण्यात आल्या असून, अवघ्या १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीसह एका तरुणीची सुटका करण्यात आली आहे. येथील इमारतीमधील एका फ्लॅटमध्ये ग्राहकांना मुली पुरवल्या जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल मुंढे यांच्या पथकाने बनावट ग्राहक पाठवून खात्री केली.

सापळा रचून टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी महिला दलाल आणि पुरुष एजंटला रंगेहाथ ताब्यात घेतले. यावेळी फ्लॅटमध्ये डांबून ठेवलेल्या एका १३ वर्षीय बालिकेची आणि एका सज्ञान तरुणीची सुटका करण्यात आली.

आरोपी ग्राहकांशी संपर्क साधून मुलींचे फोटो व्हॉट्सॲपवर पाठवत असत. मागील काही वर्षांपासून हा काळा धंदा सुरू असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. अटक करण्यात आलेल्या महिला दलालावर २०१८ मध्येही पिटा कायद्यानुसार गुन्हा दाखल होता. जामिनावर सुटल्यानंतर तिने पुन्हा हे रॅकेट सुरू केल्याचे सांगितले जात आहे.

या रॅकेटमधील फरार मुख्य पुरुष आरोपी बांगलादेशातून बेकायदेशीर मार्गाने मुलींची तस्करी करून त्यांना देहविक्रीसाठी दलालांकडे विकत असल्याचा दाट संशय आहे. बांगलादेश सीमा ओलांडून मुलींना आणण्यासाठी कोणता मार्ग वापरला, यात आंतरराष्ट्रीय टोळीचा सहभाग आहे का आणि आतापर्यंत किती मुलींना या दलदलीत ढकलले, याचा तपास पोलीस करत आहेत.

या प्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता, बालकांचे अत्याचारापासून संरक्षण कायदा आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुटका करण्‍यात आलेल्या दोन्ही पीडितांची रवानगी महिला सुधारगृहात करण्यात आली आहे.

ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गोंडुराम बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल मुंढे व त्यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT