मिरा रोड : मिरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयांतर्गत सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेत नियोजनाचा प्रचंड अभाव पाहायला मिळत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून आलेल्या हजारो तरुण-तरुणींना सध्या शहरात नरक यातना सहन कराव्या लागत आहेत. दिवसा मैदानावर आणि रात्री रस्त्यावर अशी परिस्थिती आहे. भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना रात्री निवाऱ्यासाठी रस्ते आणि रेल्वे स्थानकांचा आसरा घ्यावा लागत असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिरा-भाईंदर शहरात पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांची राहण्याची कोणतीही अधिकृत व्यवस्था प्रशासनाने केलेली नाही. त्यामुळे रेल्वे स्थानके, बसस्थानके आणि मोकळ्या मैदानांवर उमेदवारांचा तळ पडलेला आहे. पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आणि सुरक्षित निवाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. 20 फेब्रुवारी रोजी भरतीचा पहिलाच दिवस गोंधळाचा ठरला होता. 100 मीटर धावपट्टीवरील तांत्रिक बिघाडामुळे प्रक्रिया अनेक तास खोळंबली. पहाटे 5 वाजल्यापासून आलेल्या उमेदवारांना दुपारी 2 वाजेपर्यंत कडक उन्हात उपाशीपोटी ताटकळत राहावे लागले होते. त्यानंतर तरी उमेदवारांची राहण्याची व इतर व्यवस्था केली जाईल असे वाटत होते, परंतु कोणतीही व्यवस्था प्रशासनाने केली नसल्याने उमेदवारांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आम्ही हक्काची नोकरी मिळवण्यासाठी आलो आहोत, पण इथे किमान माणुसकीही दाखवली जात नाही, अशी व्यथा एका हताश उमेदवाराने बोलून दाखवली.
या परिस्थितीवर युवा काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. दरम्यान मोठमोठ्या होर्डिंग्सद्वारे लाडक्या बहिणी आणि लाडक्या भावासाठी प्रसिद्धी करण्यासाठी सरकारकडे निधी आहे. मग या विद्यार्थ्यांच्या तात्पुरत्या निवासासाठी एक सभागृह का उपलब्ध होऊ शकत नाही? असा सवाल उपस्थित होत आहे. प्रशासनाने तत्काळ शाळा, महाविद्यालयांची सभागृहे किंवा क्रीडांगणे खुली करावीत. सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा युवक काँग्रेसने दिला आहे.
पहिल्या दिवशी मैदानावर गोंधळ उडाल्याची माहिती मिळताच मनसे विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी जाऊन उमेदवारांची भेट घेतली होती. त्यानंतर मनसेचे रॉबर्ट डिसोजा यांच्या नेतृत्वाखाली उमेदवारांना पाणी आणि अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले, तसेच काही जणांची राहण्याची सोय करण्यात आली. आम्ही महिन्याभरापासून मागणी करत होतो, पण प्रशासनाने दुर्लक्ष केले, हे त्यांचे पूर्ण अपयश आहे, अशी टीका डिसोजा यांनी केली आहे. आगामी काळात होणाऱ्या चाचण्यांमध्ये तरी प्रशासन जागृत होऊन ठोस पावले उचलणार का? की उमेदवारांचे पोलीस होण्याचे स्वप्न अशाच प्रकारे रस्त्यावर पायदळी तुडवले जाणार, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.