

मुरबाड शहर : ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रशाळा, देवगाव येथील विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली होती. सहलीचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना पैठण येथील प्रसिद्ध नाथसागर धरण दाखवण्यात येत होते. मुख्याध्यापिका दीपश्री इसामे, शिक्षक एकनाथ देसले तसेच शिक्षिका प्रतिमा नागरगोजे व श्रद्धा पाटील धरणाच्या बांधावर विद्यार्थ्यांना माहिती देत असतानाच धरणाच्या काठावर
संभाजीनगर येथील वाळुंज परिसरातील शहाणे कुटुंबातील एक व्यक्ती आपल्या तीन वर्षांच्या मुलीला कडेवर घेऊन पाणी दाखवत होता. शेवाळ लागलेल्या दगडावर पाय घसरल्याने ती व्यक्ती मुलीसह थेट मुख्य जलसाठ्यात पडली. खोल पाण्यामुळे उपस्थितांमध्ये क्षणात घबराट पसरली. हा प्रसंग लक्षात येताच जिल्हा परिषद शाळा देवगावचे शिक्षक एकनाथ देसले यांनी क्षणाचाही विलंब न करता स्वतःचा जीव धोक्यात घालून मदतीसाठी धाव घेतली.
प्रथम प्रयत्नात हात सटकला तरीही त्यांनी हार न मानता पुढे जाऊन पाण्यातील मुलीचा हात पकडत दोघांनाही सुरक्षितरीत्या बाहेर काढले. त्यांच्या धैर्यामुळे बाप-लेकीचे प्राण वाचले.आपल्या मुलाला व नातीला वाचवल्याबद्दल शहाणे कुटुंबातील प्राथमिक शिक्षिका असलेल्या आजींनी ‘तुम्ही आमच्यासाठी देव बनून आलात’ असे म्हणत देसले यांचे मनःपूर्वक आभार मानले. अतिशय प्रसंगावधान, धाडस आणि मानवतेचे दर्शन घडवत दोन जीव वाचवणाऱ्या शिक्षक एकनाथ देसले यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.